डिगडोह येथील लता मंगेशकर रुग्णालयात एका महिलेने तब्बल चार मुलींना जन्म दिला. मातेची प्रकृती ठणठणीत असली तरी चारही मुलींची प्रकृती अतिशय नाजूक असून तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. कल्पना चव्हाण (वय- २५) असे महिलेचे नाव असून ती िहगणा तालुक्यातील रहिवासी आहे.

वैद्यकीय क्षेत्रात जुळे होण्याच्या नोंदी अनेक आहेत. मात्र, त्यातुलनेत तिळ्यांच्या नोंदी कमी आहेत. एकाचवेळी चार बाळांना जन्म देण्याचा प्रसंग विरळच.

डिसेंबर महिन्यात कल्पनाने सोनोग्राफी केली होती. तेव्हा तिला तिळे असल्याचे निदान झाले होते. चार मुलींना जन्म दिल्याने डॉक्टरसुद्धा पेचात पडले. डॉक्टरांसाठी ही प्रसुती आव्हानात्मक होती.

कोटीत एक घटना 

एका मातेने चार मुलींना जन्म दिल्याच्या नोंदी  वैद्यकीय जनरलमध्ये शोधण्याचा प्रयत्न केला असता एक कोटी प्रसुतीमागे एक अशी घटना घडत असल्याचे निदर्शनात आल्याचे  लता मंगेशकर वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील स्त्रीरोग व प्रसुती रोग विभागाच्या प्रमुख डॉ. सुलभा जोशी यांनी  सांगितले.