मंगेश राऊत

सध्या करोनामुळे देशात अनेकांचा जीव जात आहे; पण त्यापेक्षाही अधिक मृत्यू विविध अपघातांमुळे होत आहेत. राष्ट्रीय क्राइम रेकॉर्ड ब्युरोने (एनसीआरबी) प्रसिद्ध केलेल्या एका अहवालानुसार २०१९ या वर्षांत देशात ४ लाख २१ हजार १०४ लोकांचा अपघाती मृत्यू झाला असून त्यात १८ ते ४५ या वयोगटातील तरुणांचे ५७ टक्के प्रमाण आहे.

गेल्या वर्षी देशात ७ लाख ०१ हजार ३२४ अपघातांची नोंद झाली. त्यात ४ लाख १२ हजार ९५९ लोकांचा मृत्यू झाला व ४ लाख ४६ हजार २८४ लोक जखमी झाले. तर ८ हजार १४५ लोकांचा नैसर्गिक अपघातात मृत्यू झाला. या अपघातांमध्ये ३० ते ४५ वयोगटातील सर्वाधिक ३१ टक्के म्हणजे १ लाख ३० हजार २१२ लोकांचा मृत्यू झाला. दुसऱ्या क्रमांकावर १८ ते ३० वयोगटातील १ लाख ०९ हजार ३७८ जणांचा मृत्यू झाला. अपघातांमध्ये तरुणाच्या मृत्यूचे प्रमाण ५७ टक्के इतके आहे. ही  चिंतेची बाब आहे.

गेल्या वर्षी ४ लाख ६७ हजार अपघात

गेल्या वर्षी देशातील रस्त्यावर ४ लाख ६७ हजार १७१ अपघात घडले. त्यात ४ लाख ४२ हजार ९९६ जण जखमी झाले, १ लाख ८१ हजार ११३ जणांचा मृत्यू झाला. त्यात रेल्वेचे फाटक ओलांडताना एक हजार ७६२ आणि व रेल्वे अपघातांत २४ हजार ६१९ लोकांच्या मृत्यूचा समावेश आहे. उर्वरित १ लाख ५४ हजार ७३२ लोकांचा रस्त्यांवरील अपघातांमध्ये मृत्यू झाला.

महाराष्ट्रात वर्षभरात ३९२७ शेतकऱ्यांची आत्महत्या

गेल्या वर्षी महाराष्ट्रात ३ हजार ९२७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.  देशातील अपघात व आत्महत्यांसंदर्भात एनसीआरबीने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, महाराष्ट्रात सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत.  २०१९ मध्ये देशात १ लाख ३९ हजार १२३ जणांनी आत्महत्या केली आहे. राज्यात ३ हजार ९२७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्यात स्वत: शेती करणारे २ हजार ३५९, बटाईने शेती करणारे ३२१ आणि शेतीवर काम करणाऱ्या १ हजार २४७ लोकांचा समावेश आहे. गेल्या वर्षभरात देशात १० हजार २८१ शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग निवडला. एनसीआरबीच्या अहवालात शेतकरी आत्महत्यांची माहिती पहिल्यांदा देण्यात आली आहे.