एअर मार्शल सुनील सोमण यांचे आवाहन

भारतावर होणारे परकीय आक्रमण आणि दहशतवाद संपविण्याची जबाबदारी केवळ सैनिकांची नाही तर या देशातील प्रत्येक नागरिकांची आहे. शत्रू राष्ट्रांकडून वेगळ्या पद्धतीने देशात एक नवा दहशतवाद निर्माण होत आहे. त्यांचा मुकाबला करण्यासाठी आणि मातृभूमीचे रक्षण करण्यासाठी तरुणांनी सैन्याकडे वळावे, असे आवाहन एअर मार्शल सुनील सोमण यांनी केले.

६ जानेवारी २०१८ ला इंडियन एयर फोर्सच्या गरुड कमांडो कॉरपोरेल ज्योतीप्रकाश निराला यांना अशोक चक्र (मरणोपरांत) या सर्वोच्च सन्मानाने गौरविण्यात आले. ज्योतीप्रकाश निराला यांच्या वीरपत्नी सुषमा निराला यांचा प्रहार संस्थेच्यावतीने सत्कार आणि सन्मान करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला ज्येष्ठ विचारवंत डॉ. कुमार शास्त्री, माजी आमदार मोहन मते, प्रहार संस्थेचे संस्थापक कर्नल सुनील देशपांडे उपस्थित होते. प्रहार समाज जागृती संस्थेच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन रेशीमबागेतील स्मृती भवनमधील महर्षी सभागृहात करण्यात आले होते.

यावेळी सोमण यांनी वायुदलाच्या प्रशिक्षणाबाबत माहिती दिली. वायूदलाचे प्रशिक्षण सर्वात कठीण आहे आणि त्यासाठी कुशल संघटनासोबत ताकद, आत्मविश्वासाची गरज आहे. दहशतवाद्याशी लढाई करताना अनेक सैनिक शहीद होतात त्यावेळी त्यांच्या कुटुंबावर काय आघात होतो याचे स्मरण प्रत्येक भारतीयांनी केले पाहिजे. नव्या पिढीमध्ये राष्ट्रभक्तीची ज्योत निर्माण केली तर हजारो सैनिक तयार होऊन या दहशतवाद्याचा सामना करत देशात प्रकाश निर्माण करतील. निराला यांनी देशासाठी केलेले बलिदान हे व्यर्थ जाणार नाही. युद्धामध्ये वायुदलाची ही प्रमुख भूमिका असते त्यामुळे त्याचे प्रशिक्षण सुद्धा कठीण आहे. उत्तर काश्मीरमध्ये  दहशतवाद्याशी लढताना निराला यांनी प्राणाची आहुती देताना चार दहशतवाद्यांना मारले आहे. या त्यांच्या साहसाचा देशाने अशोकचक्र सन्मान देऊन गौरव केला आहे. देशासमोर आज दहशतवादाचे मोठे आव्हान आहे. त्यामुळे हा दहशतवाद संपावयाचा असेल तर तरुणांनी सैन्यात सहभागी व्हावे, असे आवाहन सोमण यांनी केले.

यावेळी डॉ. कुमार शास्त्री म्हणाले, देशातील दहशतवाद संपवायचा असेल सैनिकांना स्वायत्ता देण्याची गरज आहे. युद्धासाठी असलेले नियोजन, नीती आणि लक्ष्यनिर्धारण याचा कौशल्याने निराला यांनी दहशतवादाशी लढा दिला आणि त्यांनी चार दहशतवाद्यांना मारले.

मुलीलाही सैन्यात पाठवणार

ज्योतीप्रकाश निराला केवळ पती नव्हते तर माझ्यासाठी ते देव होते. दहशतवाद्याशी लढताना ते शहीद झाले तरी त्यांचे राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुलीला सैन्यात दाखल करणार आहे. ज्या ज्यावेळी ते घरी येत असे त्यावेळी ते मुलीला सैन्यातील गोष्टी सांगत होते. कधी कधी देशभक्तीचे गाणे म्हणत होते. देशाच्या रक्षणासाठी ज्योतीप्रकाश यांनी प्राणाची आहुती दिली. त्यामुळे त्यांचे स्वप्न पूर्ण करणे ही आमची जबाबदारी आहे तेवढीच देशातील प्रत्येक नागरिकांची आहे, असे मत सुषमा निराला यांनी व्यक्त केले.