चंद्रपूर : जिल्ह्यात १ जून ते १६ जुलै या कालावधीत झालेल्या पावसात १३ जणांचा मृत्यू तर १५ जण जखमी झाले. ४० पशुधनाची हानी झाली. १ हजार ३२९ घरांचे नुकसान झाले असून १३ हजार २३९.१५ हेक्टर क्षेत्रातील पिके बाधित झाली. हा प्राथमिक अंदाज असून संपूर्ण सर्वेक्षणानंतर अंतिम अहवाल तयार होणार आहे.

चंद्रपूर व चिमूर तालुक्यात सर्वाधिक ३ व्यक्ती वाहून गेले. राजुरा २, वरोरा, भद्रावती, पोंभूर्णा, जिवती व कोरपना तालुक्यात प्रत्येकी एक व्यक्ती वाहून गेला. पिकांचे सर्वाधिक नुकसान राजुरा, कोरपना व भद्रावती या तीन तालुक्यात झाले. घरांचे सर्वाधिक नुकसान भद्रावती, सावली, कोरपना व राजुरा या चार तालुक्यात झाले आहे. सर्व पंधरा तालुक्यात सर्वेक्षणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम विभागांचे रस्ते, इमारती व इतर नुकसानीचे सर्वेक्षण सुरू आहे. नुकसानीचा अंतिम अहवाल तयार झाल्यानंतरच नेमके किती नुकसान झाले, याचा अंदाज येणार आहे. दोन गावे आणि शहरांना जोडणाऱ्या पुलांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हनुमान खिडकी येथे किल्ल्याचे नुकसान झाले आहे. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे. पावसात अनेक रस्त्यांचे डांबीकरण वाहून गेले आहे. काही शासकीय इमारती, शाळा गळायला लागल्या आहेत. याचेही सर्वेक्षण सुरू आहे.