बुलढाणा: बुलढाणा पोलिस विभागासमोर तपासाचे आव्हान उभे करणाऱ्या ‘छर्रा गॅंग’ या आंतरराज्यीय टोळीच्या सुत्रधारासह उर्वरीत ६ गुन्हेगारांना जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. पोलीस अधीक्षक सारंग आवाड यांच्या मार्गदर्शनात वडोदरा ते गोध्रा मार्गावर असलेल्या डाकोर (गुजरात) येथे ही थरारक कारवाई करण्यात आली. आरोपींच्या ताब्यातून तब्बल ६ लाख ७६ हजार ८१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या कारवाईचे मूळ बुलढाणा जिल्ह्यातील खामगांव शहरातील एका चोरीच्या घटनेत आहे. खामगावातील गांधी चौकात उभ्या असलेल्या ॲक्टीवा मोटार सायकलच्या डिक्कीतून १६ मार्च रोजी अज्ञात चोरट्यांनी ६ लाख रुपये लंपास केले होते . प्रारंभी खामगांव शहर पोलिसांत अज्ञात आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अधिक्षकांच्या आदेशावरून ‘एलसीबी’ चे पोलीस निरीक्षक अशोक लांडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तपास सुरू केला.
असा लागला छडा
शाखेने अभिलेखावरील गुन्हेगारांची माहिती काढली. मागील १७ मार्च रोजी आनंदसागर (शेगांव) नजीक दरोड्याच्या तयारीत असलेल्या तीन दरोडेखोरांना अटक करण्यात आली असताना ७ आरोपी फरार झाले होते. पोलीस अधीक्षक आवाड, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल कोळी यांच्या मार्गदर्शनात अशोक लांडे यांनी स्थागुशाचे विशेष पथक तयार करुन अहमदाबाद (गुजरात) येथे रवाना केले. पथकाने कोणतीही माहिती नसतांना छर्रा नगर, कुबेर नगरमध्ये जावून आरोपींची माहिती काढली. उपरोक्त ठिकाणी आरोपींना अटक करणे अशक्यप्राय असल्याने पोलीस अधिक्षकांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे ‘गनिमी कावा’ने आरोपींना उपरोक्त परिसरातून बाहेर पडण्यास भाग पाडले. मात्र चाणाक्ष आरोपी पावागडच्या यात्रेत दडून पोलिसांना गुंगारा देत वडोदरा-गोध्रा या मार्गाने पळाले. आरोपी फरार झाल्याचे समजाच सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास सानप, अंमलदार, गणेश पाटील, युवराज राठोड, गजानन गोरले, विजय सोनोने यांनी डाकोर नजीक सनी सुरेंद्र तमांचे, दिपक धिरुभाई बजरंगे, मयूर दिनेश बजरंगे, राजेश ऊर्फ राकेश देवची तमांचे, रवि नारंग गारगे व मुन्नाभाई मेहरूनभाई इदरेकर, या ६ आरोपींना ‘सिनेस्टाईल’ जेरबंद केले. आरोपींच्या ताब्यातून ६ लाख ७६ हजार ८१० रुपयांचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला आहे.