नागपूर : उपराजधानातील पोलिसांचा वचक संपल्यामुळे महिला व तरुणींची सुरक्षाव्यवस्था वाऱ्यावर असल्याचे चित्र आहे. महिलांवर लैंगिक अत्याचारासह अन्य प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. गेल्या चोवीस तासात दोन तरुणींवर लैंगिक अत्याचाराच्या घटना उघडकीस आल्या आहेत. नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका १६ वर्षीय मुलीवर तब्बल ५ जणांना बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पीडित १६ वर्षीय मुलगी सना (काल्पनिक नाव) हिच्या आईवडिलांचे निधन झाले असून ती नवीन कामठी परिसरात काका-आत्याकडे राहते. तिची इंस्टाग्रामवरून अमान खान (इस्माईलपुरा, कामठी) या युवकाशी ओळख झाली. दोघांचा बरेच दिवस संवाद सुरु होता. त्यातून दोघांची मैत्री झाली. अमानने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. दोघांच्याही भेटीगाठी व्हायला लागल्या. जानेवारी महिन्यात अमानने तिला दोन तासांसाठी फिरायला येण्यासाठी नेले. ती सकाळीच अमानच्या दुचाकीवर बसून कामठी रोडवरील एका हॉटेलमध्ये गेली. जेवन केल्यानंतर अमानने तिला एका लॉजवर नेले आणि तेथे रात्रभर तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. दुसऱ्या दिवशी तिला लग्नाचे आमिष दाखवले. दुसरीकडे तिच्या आत्याने पोलिसांत बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. दुसऱ्या दिवशी सांयकाळी अमानने तिला घरी सोडले. पोलिसांत हजर केल्यानंतर तिने शारीरिक संबंधाबाबत कुणालाही सांगितले नाही. तिच्या आत्याने तिला घरी नेले. मार्च महिन्यात तिला इंस्टाग्रामवरून अमानचा मॅसेज आला. त्याने भेटायला येण्यासाठी घराबाहेर येण्यास सांगितले. काही वेळातच अमानने सनाला कामठीतील मित्र हुजैर याच्या घरी नेले. तेथे अमानने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

हेही वाचा >>>न्यायालयात गोंधळ घालणारी युवती अचानक बेपत्ता

दरम्यान अमानने आपले चार मित्र राज, हुजैर, मोनू, बबलू यांना बोलावले. सनाला चारही मित्रांशी शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकला. अमानसह त्याच्या चारही मित्रांनी सनावर आळीपाळीने बलात्कार केला. पाच जणांनी लैंगिक अत्याचार केल्यामुळे सनाची प्रकृती बिघडली. यादरम्यान हुजैरची आई घरी आली. सनाने पाच जणांनी लैंगिक अत्याचार केल्याची माहिती दिली. तिने सनाची समजूत घालून तक्रार न करण्याचा सल्ला दिला. चार दिवस स्वतःच्या घरी ठेवले. तिचा काका तेथे शोधत आल्यानंतर हुजैरच्या आईने तिला मोमीनपुऱ्यातील नातेवाईकांच्या घरी ठेवले.

प्रियकराने मध्यरात्री सोडले रस्त्यावर

अमान खानने सनाशी संपर्क केला आणि मोमीनपुऱ्यातून तिला पुन्हा पिलीनदी परीसरातील एका हॉटेलमध्ये नेले. तिच्याशी मध्यरात्रीपर्यंत शारीरिक संबंध ठेवले आणि तेवढ्या रात्रीच रस्त्यावर सोडून पळ काढला. ती रात्रभर रस्त्यावर भटकत राहिली. शेवटी ती वडिलाच्या मित्राला फिरताना दिसली. त्याने तिला घरी नेले. चौकशीत तिने सर्व हकिकत सांगितली. त्याने सनाच्या काकाला बोलावून घेत पोलीस ठाण्यात जाण्याचा सल्ला दिला. ठाणेदार प्रमोद पोरे यांच्या मार्गर्शनात प्रभारी दुय्यम निरीक्षक रेखा संकपाळ यांनी मुलीच्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेतली. मुलीचा प्रियकर अमानसह पाचही जणांवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध सुरु केला आहे.