अमरावती : शहरातील ‘मिलन मिठाई’ या प्रतिष्ठानाचे संचालक अशोक होशियारसिंह शर्मा (६२, रा. महेश नगर, बडनेरा रोड) यांनी स्वत:च्या छातीत बंदुकीने गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना रविवारी रात्री उशिरा उघडकीस आली. अशोक शर्मा हे गेल्या काही महिन्यांपासून पायाच्या व्याधीने त्रस्त होते. त्या व्याधीला कंटाळल्यामुळेच त्यांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती राजापेठ पोलिसांनी दिली.
अशोक शर्मा यांचे कुटुंबीय सायंकाळी मंदिरात दर्शनासाठी गेले होते. त्यावेळी कुटुंबीयांनी त्यांना सोबत चालण्याचा आग्रह केला होता, पण ते घरीच थांबले. घरी कुणी नसल्याची संधी साधून अशोक शर्मा यांनी जीवनयात्रा संपविली. अशोक शर्मा यांच्याकडे जुन्या पद्धतीची मोठी बंदूक होती. या बंदुकीनेच त्यांनी स्वत:वर गोळी झाडली. त्यांचे कुटुंबीय घरी परतल्यानंतर ही घटना उघडकीस आली.
हेही वाचा – अमरावती परिक्षेत्रात लाचखोरीच्या प्रकरणांची पंचाहत्तरी
पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. तरीही त्यांचे पायाचे दुखणे कमी झाले नव्हते, त्यामुळे ते त्रस्त होते, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली. राजापेठ पोलीस घटनेचा तपास करीत आहेत.