यवतमाळ : वणी येथे यवतमाळ मार्गावरील पळसोनी फाट्याजवळ असलेल्या योगेश ट्रेडर्स या सिमेंट स्टील गोदामात अज्ञात दरोडेखोरांनी दरोडा टाकून तेथे तैनात असलेल्या रखवालदाराचा निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना आज उघडकीस आली. रविवारी मध्यरात्री दरोडेखोरांनी गोदामात दरोडा टाकून रखवालदाराचा खून केल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. जीवन विठ्ठल झाडे (६२, रा. आष्टोना, ता. राळेगाव), असे मृत रखवालदाराचे नाव आहे. दरोडेखोरांनी गोदामाच्या आवारात ठेऊन असलेली २४० किलो वजनाची चार सळाखींची बंडलं चोरी केल्याचे सांगण्यात येते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लालपुलिया परिसरात पळसोनी फाट्याजवळ योगेश ट्रेडर्सचे सिमेंट स्टील गोदाम आहे. सुरेश खिवंसरा यांच्या मालकीचे हे गोदाम असून येथे मोठ्या प्रमाणात लोखंडी सळाखींचा साठा ठेवण्यात आला आहे. मुख्य मार्गाच्या बाजूलाच हे गोदाम असले तरी व्यावसायिक बाजारपेठ व लोक वस्तीपासून ते लांब आहे. या गोदामाच्या सुरक्षेसाठी जीवन झाडे यांना रखवालदार म्हणून ठेवण्यात आले होते. ते पत्नीसह तेथेच राहायचे. त्यांची पत्नी कालच काही कामानिमित्त मूळगावी गेली होती. वडकी पोलीस ठाणे हद्दीत येणाऱ्या आष्टोना गावचे ते रहिवाशी होते. रविवारी रात्री अज्ञात दरोडेखोरांनी त्यांचा लोखंडी वस्तूने डोक्यावर व खांद्यावर प्रहार करून खून केला. दरोडेखोरांनी लोखंडी सळाखींची चार बंडलं (२४० किलो किंमत १४ हजार रुपये) चोरून नेली.

हेही वाचा >>>सैलानी बाबा ‘लालपरी’ला पावले! ९७ लाख ५३ हजारांचा उत्पन्नरूपी प्रसाद

घटनास्थळावर वाहनाच्या टायरच्या खुणा असून मालवाहू वाहनातून सळाखी चोरी केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध दरोडा व खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

जीवन झाडे हे मागील अनेक वर्षांपासून या गोदामात रखवालदार म्हणून काम करायचे. ते व त्यांची पत्नी गोदामाजवळीलच एका खोलीत राहायचे. मालकाचे ते अतिशय विश्वासू होते. गोदामांची पूर्ण रखवाली त्यांच्यावर सोपविण्यात आली होती. रविवारी ते कामावर असताना अज्ञात दरोडेखोरांनी गोदामात दरोडा टाकला. गोदामाच्या आवारातील सळाखीची बंडलं चोरून नेतांनाच दरोडेखोरांनी लोखंडी वस्तूने प्रहार करून जीवन झाडे यांचा निर्घृण खून केला. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच  तत्काळ घटनास्थळ गाठले. एसडीपीओ गणेश किंद्रे, ठाणेदार अनिल बेहेरानी यांच्यासह सपोनि गुल्हाने व पोलिसांचा मोठा ताफा घटनास्थळी दाखल झाला. अप्पर पोलिस अधीक्षक पियुष जगताप यांनी देखील घटनास्थळाला भेट दिली.  या प्रकरणाचा तपास शिरपूरचे ठाणेदार माधव शिंदे करत आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A robbery at a cement and steel godown nrp 78 amy