शिवसेनेची जनआशीर्वाद यात्रा विदर्भात
नागपूर : विधानसभा निवडणूक काही दिवसावर असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यात्रेला प्रारंभ केल्यानंतर शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य यांनीही जनआशीर्वाद यात्रा काढण्याचा निर्णय घेतला. यात्रेसाठी मंगळवारी ते विदर्भात आले. मात्र, त्यांनी ‘मी खूप छोटा आहे,’ असे सांगून राजकीय प्रश्नांना बगल दिली.
शिवसेनेने आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात मंगळवारी जनआशीर्वाद यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याला विदर्भात सुरुवात केली. काँग्रेसमधून बडतर्फ झालेले माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांच्या वानाडोंगरी येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांशी आदित्य यांनी संवाद साधला. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत आदित्य यांनी राजकीय प्रश्नांना मोघम उत्तर देऊन वेळ मारून नेली. साडेअकरा मिनिटांच्या पत्रपरिषदेत दोनवेळा त्यांनी मी खूप छोटा आहे, असे उत्तर दिले. विद्यमान आमदार असलेल्या जागा सोडून ५०-५० जागांवर युती होईल, असे मुख्यमंत्री सांगत आहे. मात्र, मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्या संयुक्त पत्रपरिषदेत २८८ जागांचा विचार झाला होता, असे पत्रकारांकडून विचारण्यात आले . त्यावर आदित्य म्हणाले, त्यासंदर्भात बोलायला मी खूप छोटा आहे. परंतु शिवसेना कोणाचा विश्वास तोडणार नाही. ही युती सत्तेसाठी नाही तर मुद्यांवर होणार आहे.
वेगळ्या विदर्भाबाबत मुख्यमंत्र्यांची भूमिका बदलेली आहे, असे विचारले असता महाराष्ट्राचा विकास होत आहे. शेतकरी आत्महत्या वाढतच चाललेल्या आहेत, यावर ते म्हणाले, शिवसेना ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण करीत असते. आम्ही शेतकऱ्यांसोबत नेहमी राहिलेलो आहेत. सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीत त्रुटी आहेत. आम्ही सरसकट कर्जमाफी करीत आहोत. पीक विमा मोठा प्रश्न आहे. शिवसेनेने मोर्चा काढला म्हणून पीक विम्याचे ९०७ कोटी रुपये १० लाख शेतकऱ्यांना मिळाले आहेत, असा दावाही त्यांनी केला आणि आर्थिक मंदी असून व्यापाऱ्यांना दिला देणे गरजेचे आहे, असे सांगितले. तुम्ही मुख्यमंत्री होणार काय? निवडणूक लढणार काय? असा प्रश्न आला असता हा पेपर फोडणार नाही, असे उत्तर देऊन त्यांनी पळवाट शोधली.
खंडणीखोर शिवसैनिकांवर कायद्यानुसार कारवाई होत आहे. शिवसेना त्यामध्ये येणार नाही, असे सांगून विरोधकांवर ईडीची कारवाई होत असल्याबद्दल त्यांनी निर्थक चर्चा करू नये, असे सांगून बोलण्याचे टाळले. मात्र, पुढील निवडणूक कर्जमुक्ती, पीक विमा, महिलांचा प्रश्न, दुष्काळमुक्त महाराष्ट्र या मुद्यांवर लढणार असल्याचे आदित्य यांनी सांगितले.
अभ्यासक्रम बदलण्याची गरज -आदित्य
* देशातील शिक्षण पद्धती बदलणे तसेच शैक्षणिक सुधारणा करणे आवश्यक आहे. ५० वर्षांपासून विद्यापीठांचे अभ्यासक्रम बदललेले नाहीत. यामुळे शिक्षित तरुणांना नोकरी मिळत नाही, असे मत युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले. आरक्षणामुळे कोणावरही अन्याय होऊ नये, असे ते म्हणाले.
* जनआशीर्वाद यात्रेदरम्यान आदित्य ठाकरे यांनी प्रियदर्शिनी इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनिअरिंगमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधला. अभियांत्रिकीचा कालबा’ अभ्यासक्रम बदलणे आवश्यक असल्याचे आदित्य म्हणाले. यावेळी एका विद्यार्थिनीने शेतमालाच्या हमीभावावर प्रश्न केला असता, शेतकरी राबराब राबतो, त्याच्या मालाला भाव मिळायलाच हवा. त्यासाठी शिवसेना कटिबद्ध आहे, असेही आदित्य ठाकरे म्हणाले. विद्यार्थिनींना आत्मसंरक्षणाचे धडे द्यावे, आरक्षणामुळे कोणावरही अन्याय होऊ नये, सर्वाना समान संधी मिळावी, असे ते म्हणाले.