नागपूर : राज्यातील एस.एस.सी.जी.डी. मध्ये वगळण्यात आलेल्या सर्व उमेदवारांना अंतिम निवड यादीत सामावून घेण्यात यावे, अशी मागणी करत आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वर्धा मार्गावरील निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन केले. यावेळी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. विदर्भ युवा संयोजक पीयूष आखरे व संयोजक गिरीश तितरमारे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गृहमंत्रालयाकडून कर्मचारी नियुक्त आयोग यांच्यामार्फत ६० हजार पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली. यात हजारो युवकांनी अर्ज केले. भरती प्रक्रियेत आवश्यक ती चाचणी पूर्ण करून पात्र असूनही केवळ ५४ हजार पात्र उमेदवारांची निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली. केवळ ६० हजार उमेदवारांपैकी ५४ हजार उमेदवारांची अंतिम निवड यादी प्रसिद्ध करून पात्र उमेदवारांवर केंद्र सरकारने अन्याय केला आहे.  चाचणीमध्ये उत्तीर्ण  युवकांचा समावेश करण्यात यावा, अशी मागणी करत आम आदमी पक्षाने आंदोलन केले. पोलिसांची परवानगी न घेता आंदोलन केल्यामुळे सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले. यावेळी शुभम मोरे, योगेश पराते, प्रियंका तंब्बे, स्वीटी इंदोरकर, पार्थ मीरे, अभय भोयर सुरेश लांजेवार आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aap agitation in front of gadkari house ssh
First published on: 18-07-2021 at 08:11 IST