खडकांवरील कलाकृतींच्या प्रदर्शनाचे उद्घाटन
जगभरातील कानाकोपऱ्यात प्राचीन आणि पुरातन कलांचा वारसा आहे, पण अजूनही त्यातील अनेक कला दुर्लक्षित आहेत. रॉक आर्ट म्हणजेच खडकांवरील कलाकृती ही त्याच एका दुर्लक्षित कलेपैकी एक आहे. देशविदेशातील या दुर्लक्षित कलाकृती पाहिल्यानंतर ३० ते ४० हजार वर्षांपूर्वीचा कालखंड आणि त्या कालखंडातील आपल्या पूर्वजांची ओळख होते. किंबहूना पूर्वजांना ओळखण्याचे एक चांगले माध्यम या खडकांवरील कलाकृतीच्या माध्यमातून समोर आले आहे. नागपूरकरांसाठी हा अनमोल खजाना नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र आणि भारतीय पुरातत्त्व खात्याने उपलब्ध करून दिला आहे.
आशिया जगातला सर्वात मोठा महाद्वीप आणि त्याचा खडकांवरील कलेचा वारसा खूप प्राचीन आहे. केंद्रीय, पश्चिम, दक्षिण, पूर्व आणि दक्षिणपूर्व आशियात तो विखुरला आहे. जम्मू-काश्मीर, कर्नाटक, आंध्रप्रदेशमधील खडकांवरील कला शिलाखंडात सापडते. केरळमधील खडकांवरील कला जमिनीच्याखालील गुफांकरिता ओळखली जाते. तर तामिळनाडूची खडकांवरील कला म्हणजे तिथल्या दगडांच्या समाधींवर दिसून येते. रॉक आर्ट या प्रदर्शनाच्या माध्यमातून या सर्व कलाकृती एकाच छताखाली रसिकांसाठी उपलब्ध झाल्या आहेत. प्रामुख्याने शिकारदृष्य, प्राण्यांचे समूह आणि नृत्यसाधनेत रमलेली माणसांच्या विषयांकरिता जम्मू-काश्मीरची खडकांवरील कला प्रसिद्ध आहे. ती या ठिकाणी उपलब्ध आहे. भारतासोबतच अफ्रिका, युरोप, ऑस्ट्रेलिया, उत्तर आणि दक्षिण अमेरिका, सहाराचे वाळवंट, फ्रान्स, कॅलिफोर्निया, तंजानिया आदी देशातील ३० ते ४० हजार वर्षांपूर्वीच्या खडकांवरील कलाकृती कलारसिक त्या ठिकाणी जाऊन पाहू शकला नसता. मात्र, या प्रदर्शनाने भारताबाहेरील या दुर्लक्षित कलाकृती सहजपणे त्यांना पाहायला मिळत आहेत. युरोपच्या खडकांवरील कलाकृतीचा प्रारंभ तसेच त्यांच्या ३५० गुफा, खडकाश्रय, मोकळे पुरातनस्थळ हिमयुगाशी संबंधित आहे. त्याचीही चित्रे माहितीसह या प्रदर्शनात लावण्यात आली आहेत. फ्रान्सचा दक्षिण व दक्षिण-पश्चिम भाग, स्पेनचा उत्तर भाग आणि पोर्तुगालच्या उत्तर भागातील कला या ठिकाणी आहे. दक्षिण फ्रान्सची विशेष उल्लेखनीय चौवेत गुफासुद्धा या ठिकाणी पाहायला मिळते. त्यातील चित्रांचे तथ्यांकन सुमारे ३० हजार वषार्ंच्या आसपास करण्यात आले आहे.
लास्कोक्सच्या प्रसिद्ध चित्र समूहात घोडा, बैल, माकड या प्राण्यांची चित्रे आहेत. भाषा, लिपी हा प्रकार जेव्हा अस्तित्त्वात नव्हता तेव्हा चित्रांच्या माध्यमातून भावना व्यक्त केल्या जात होत्या. शिल्पकलेसारख्या कलेतून त्या अनेकांनी पाहिल्या आहेत, पण त्याहीपेक्षा पूर्वजांची ओळख करून देण्याचे एक चांगले माध्यम म्हणजेच खडकांवरील कलाकृती ही आतापर्यंत दुर्लक्षित होती. इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्राच्या माध्यमातून ही कलाकृती शोधून ती नागरिकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून नागपूर येथे प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून त्याला पहिल्याच दिवशी उदंड प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे या प्रदर्शनासोबतच पुरातत्त्व विभागाच्यावतीने ‘स्प्लेंडर्स ऑफ गाविलगड हिल्स’ आणि ‘अमेझिंग विदर्भ’ या प्रदर्शनाच्या माध्यमातून वैदर्भीय पुरातत्त्व कला समोर आली आहे.