सिंधू एज्युकेशन सोसायटीचे सचिव, तसेच मुख्याध्यापक दीपक बजाज याने दीड महिन्यानंतर अखेर लाचलुपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) च्या कार्यालयात गुरुवारी, सकाळी आत्मसमर्पण केले. कोटय़वधींची बेहिशेबी माया जमविल्याचा आरोप असलेल्या बजाज याला शुक्रवारी (१३ नोव्हेंबर) न्यायालयात हजर केले जाणार आहे. यापूर्वी बजाजने सर्वोच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनाकरिता अर्ज केला असता तो फेटाळण्यात आला होता. न्यायालयाने बजाज याला १२ नोव्हेंबरपूर्वी आत्मसमर्पणाचे आदेश दिले होते.

एसीबीने सप्टेंबरमध्ये दीपक बजाज आणि वीणा बजाज दाम्पत्याकडे दोन वेळा छापे टाकले. त्यात पहिल्यांदा १८ लाखांची, तर दुसऱ्यांदा १४ लाखांच्या रोखीसह एसीबीला कोटय़वधींची संपत्ती बजाज दाम्पत्याकडे आढळून आली. त्यानंतर एसीबीने बेहिशेबी संपत्ती जमविल्याप्रकरणी बजाज याच्यावर गुन्हा दाखल केला. पोलिसांकडून अटक होण्याची शक्यता बघता दीपक बजाज आपल्या मुलीसह फरार झाला. त्यानंतर एसीबीने पुन्हा दीपक बजाज याच्या के.सी. बजाज मार्ग, जरीपटका येथील शिवकृपा निवासस्थानावर आणि महात्मा गांधी सेंटेनियल सिंधू हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या कार्यालयावर वेगवेगळ्या पथकांच्या मदतीने २४, २५, ३० सप्टेंबरला छापे मारले.

याप्रसंगी कोटय़वधींची चल-अचल संपत्ती पोलिसांनी जप्त केली. यात रोख, सोनेचांदीचे दागिने व इतर महागडय़ा वस्तूंचा समावेश होता. शिक्षक आणि प्राध्यापकांसह शिक्षण संस्थेतील कर्मचाऱ्यांकडून नोकरी देण्याच्या मोबदल्यात लाखो रुपयांच्या देणग्या घेतल्याच्या आरोपानंतर ही कारवाई झाली होती.