• हजारो बेघर नागरिकांची वर्धा ते नागपूर पदयात्रा
  • मुख्यमंत्र्याची भेट होईपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार

अतिक्रमणधारकांना कायमस्वरुपी मालकी हक्काचे पट्टे मिळावे, या मागणीच्या पूर्ततेसाठी युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष निहाल पांडे, वर्धा जिल्हाध्यक्ष पलाश उमाटे यांच्या नेतृत्वाखाली २० मार्चला वर्धेतून निघालेली पदयात्रा शुक्रवारी नागपुरात दाखल झाली आहे. यात एक ते दीड हजार नागरिक सहभागी झाले आहेत. गुरुवारी रात्री वर्धामार्गावरील एका हॉटेलपुढील जागेत विश्रांती घेतल्यानंतर आज दुपारी उन्हाची पर्वा न करता पदयात्रा संविधान चौकात पोहोचली.

तीन दिवसांपासून घराबाहेर पडलेल्या आणि रात्री थोडी विश्रांती घेऊन परत दिवसभर चालत आलेल्या या आंदोलकांमध्ये  सरकार धोरणाविरोधात संताप आणि आपण गरीबीत जन्मालो याचे दुख दिसून येत होते. घराचे मालकी पट्टे मिळणे हा आमचा अधिकार आहे, अशा घोषणा ते देत होते.  प्रत्येकाला घर हवे असते, मात्र आमची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने आम्ही घर काय जमीन देखील घेऊ शकत नाही.  म्हणून आम्ही रानावनात, उघडय़ावर राहायचे काय, असा संताप्त सवाल पदयात्रेत सहभागी आंदोलकांनी केला. निवडणुकासमोर असल्या की लोकप्रतिनिधी आणि राजकीय नेते मालकी हक्काचे पट्टे देण्याची आश्वासने देतात आणि निवडणुका संपल्या ते विसरून जातात. प्रशासनाने ‘अतिक्रणधारक’चा शिक्का आमच्या माथी  मारल्याने आमची मरेपर्यंत ओखळ  हीच कायम राहावी, असे लोकांनी  निवडून दिलेल्या सरकारला वाटते काय, असे आम्हाला मुख्यमंत्र्यांना विचारायचे आहे, असे युवाचे संस्थापक अध्यक्ष निहाल पांडे म्हणाले.

पंचशील चौकात सभा

नाशिक ते मुंबई असा लाँग मार्च काढून वन जमीन पट्टय़ाची तसेच इतर मागण्या मान्य करण्यास सरकारला भाग पाडल्याचे ताजे उदाहरण असताना  मालकी हक्काचे पट्टे मिळावे यासाठी वर्धा ते नागपूर अशी पदयात्रा काढण्यात आली. या आंदोलनाला काँग्रेस,  जय जवान जय किसान आदी समर्थन दिले आहे. पंचशील चौकात या पदयात्रेला माजी खासदार नाना पटोले यांनी संबोधित केले. यावेळी त्यांनी सरकारवर  टीका केला. फडणवीस सकार शिवाजी महाराज यांचे नाव घेऊन राज्य करत आहे. शिवाजी महारजांनी रयतेचे राज्य निर्माण केले होते, फडणवीस सरकारच्या राज्यात रयत दुखी आहे. वर्धेसह संपूर्ण राज्यातील वनजमीन, गावठाण आणि घराचे मालकी हक्काचे पट्टे देण्याची  प्रकरणे मार्गी लावावी, अशी मागणी पटोले यांनी केली.

पदयात्रेत रुग्णवाहिका

युवा ही संघटनेचे जाळे वर्धा जिल्ह्य़ातील काही तालुक्यात आहे. वर्धेत दोन वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या या संघटनेचे कार्यकर्ते हिंगणघाट, आर्वी, सिंधी रेल्वे (सेलू), देवळी आदी तालुक्यात आहेत. संघटनेच्या दोनशे कार्यकर्त्यांनी या पदयात्रेची तयारी केली. यात सहभागी आंदोलकांच्या खाण्या पिण्याची व्यवस्था केली. सोबत अन्नधान्य आणि पाणी घेतले. तसेच ओळखीच्या डॉक्टराकडून एक आणि शासकीय रुग्णालयाकडून एक  असा दोन रुग्णवाहिकांची व्यवस्था केली. वर्धा ते नागपूर असा ८५ किमी अंतर चालताना वाटेत पायाला दुखापत झाली की, लगेच त्यांच्यावर उपचार केले जात होते. त्यामुळे नाशिक ते मुंबई दरम्यान झालेल्या लाँग मार्चची पुनरावृत्ती टळली.

सेलू, आसोला व नागपूर ठिकाणी रात्री विश्रांती घेण्यात आली. संघटनेचे कार्यकर्ते आणि पदयात्रेत सहभागी महिला मिळून स्वयंपाक करीत होते. सकाळी मसाला भात दिला जात होता. अनेक राजकीय पक्षांनी यासाठी मदत देऊ केली. परंतु ती घेण्यास नकार देण्यात आला, असे खानपान व्यवस्था प्रमुख, युवाचे संपर्क प्रमुख समीर गिरी म्हणाले.

‘‘मुख्यमंत्र्यांना वर्धा जिल्हाधिकारी यांच्या मार्फत चार महिन्यापूर्वी पत्र पाठवले आहे. नागपूरच्या मुख्यमंत्री सचिवालयातील विशेष कार्यासिन अधिकारी आशा पठाण यांनाही तीन आठवडय़ापूर्वी निवेदन दिले. वर्धा ते नागपूर ८५ किमी अंतर चालत चालत हजारो लोक आले. अनेकांच्या पायाला दुखापती झाल्या.  मुख्यमंत्र्यांनी येथे येऊन आंदोलकांच्या मागण्या मान्य कराव्या. तोपर्यंत आम्ही संविधान चौकातून हलणार नाही.’’

निहाल पांडे, संस्थापक अध्यक्ष, युवा.