यवतमाळ : शहरात जीवन प्राधिकरणकडून सध्या वेळी अवेळी व अनियमितता पाणी पुरवठा सुरू आहे.  या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज गुरुवारी जीवन प्राधिकरणच्या कार्यालयावर घागर मोर्चा काढण्यात आला.  यावेळी मोर्चेकर्यांनी कार्यकारी अभियंत्यांना पाण्याच्या घागरीवरच समस्या लिहून रिकामी घागर भेट दिली.

वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ. नीरज वाघमारे यांच्या  नेतृत्वात कार्यकर्त्यांनी कार्यकारी अभियंत्यांच्या कक्षात ठिय्या मांडला. यवतमाळ शहराची तहान भागवणाऱ्या धरणात मुबलक पाणी असूनसुद्धा, फक्त अधिकाऱ्यांच्या बेपर्वा आणि ढिसाळ नियोजनामुळे शहरात रात्री, बेरात्री  अनियमित पाणी,पुरवठा होत आहे. महिलांना, नागरिकांना नळाला पाणी येण्याची वाट पाहत ताटकळत बसावे लागते. त्यामुळे रोज ठराविक वेळेनुसार स्वच्छ आणि नियमित पाणी पुरवठा करावा, कर्तव्यात कसुर करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कठोर कार्यवाही करावी, इत्यादी समस्या पाण्याच्या घागरीवर लिहूनच कार्यकारी अभियंता यांना प्रतिकात्मक भेट देण्यात आली.

हेही वाचा >>>नितीन गडकरींनी आश्वासन पाळले नाही म्हणून नागपुरात निदर्शने….

या समस्यांचे तातडीने निवारण करण्यात यावे अन्यथा वंचित बहुजन आघाडी तर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला.  यावेळी महिला आघाडी जिल्हाध्यक्षा धम्मवती वासनिक, जिल्हा महासचिव शिवदास कांबळे, युवा जिल्हाध्यक्ष आकाश वाणी आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.