नागपूर : जय विदर्भ पार्टीने आज व्हेरायटी चौक, नागपूर येथे “वादा निभाओ – विदर्भ राज्य बनाओ” अशा घोषणा देत निदर्शने केली. यावेळी आंदोलक म्हणाले, सत्तेत येण्यापूर्वी भाजपचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी राज्यात व केंद्रात सत्तेत आल्यास १०० दिवसात विदर्भाचे स्वतंत्र राज्य निर्माण करू असे लेखी आश्वासन दिले होते. आश्वासन देऊन १० वर्षे लोटूनही आजपर्यंत स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीबद्दल भाजपचा एकही नेता संसदेमध्ये विदर्भाचा आवाज उचलून धरताना दिसला नाही.

केंद्र सरकारने लोकसभा निवडणुकीपूर्वी स्वतंत्र राज्य निर्माण करून २०१४ च्या दिलेल्या आश्वासनाची पूर्ती करावी. अन्यथा, विदर्भाची जनता भाजपला विदर्भातून हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा विदर्भ पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अरुण केदार यांनी दिला.

हेही वाचा…आमदार गायकवाडांविरुद्धचे शुक्लकाष्ठ थांबेना….पुन्हा नवीन गुन्हा दाखल

“वेगळा विदर्भ झालाच पाहिजे”, “लेके रहेंगे-लेके रहेंगे-विदर्भ राज लेके रहेंगे”, “अभी तो यह अंगडाई है-आगे घोर लढाई है”, “लढेंगे-जितेंगे”, “केंद्र शासन मुर्दाबाद…..मुर्दाबाद”, “भाजपा सरकार मुर्दाबाद….मुर्दाबाद”, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या व या सरकारची प्रतिकृती म्हणून सदाफुलीचे (बेशरम) झाड दाखवून निषेध व्यक्त करण्यात आला.

अरुण केदार म्हणाले, मोदी काल यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले परंतु त्यांनी वैदर्भीय जनतेची दखल सुद्धा घेतली नाही. विदर्भात दररोज सात शेतकरी आत्महत्या करत आहेत, त्यातही यवतमाळ हा आशिया खंडातील सर्वाधिक शेतकरी आत्महत्या करणारा जिल्हा आहे. यावर पंतप्रधानांनी एकही शब्द बोलू नये हा वैदर्भीय जनतेचा, शहीद शेतकरी व त्यांच्या कुटुंबीयांचा अपमान आहे. १०० दिवसांच्या आत राज्य देण्याचे आश्वासन देऊनही आजही वैदर्भीय जनतेला स्वतंत्र विदर्भाच्या राज्याची मागणी करावी लागत आहे.

हेही वाचा…VIDEO : अस्वलाचे कुटुंब मंदिरात आले; पिंडीजवळ थांबले, प्रसाद खाल्ला आणि….

मोदी आपल्या गॅरंटीचा प्रचार करीत आहेत , दिलेल्या आश्वासनांना विसरून नव्या आश्वासनाची खैरात वाटत आहेत. कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे व भाजपला आता विदर्भातून हद्दपार करून वैदर्भीय जनतेच्या जय विदर्भ पार्टीला सत्तेत आणावे, असे आवाहन त्यांनी केले. पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकेश मासुरकर यांनी भाजपला त्यांच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतील १९९७ च्या भुवनेश्वर येथील ठरावाची आठवण करुन देत विदर्भाचे राज्य तत्काळ निर्माण करावे अन्यथा भाजपची कोंबडीसुद्धा विदर्भात अंडा देणार नाही, अशी व्यवस्था आम्ही निर्माण करू असा इशारा दिला.