कायदा व सुव्यवस्थेवर जाब विचारणार!

‘बाजीराव मस्तानी’ हा चित्रपट भाजप कार्यकर्त्यांकडून बंद पाडला जात असून शासन स्वत:च्या भूमिकेबाबत संभ्रमित आहे,

अजित पवार, ajit pawar
Ajit Pawar: राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना व राज ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली.

अजित पवार यांची टीका; ‘बाजीराव मस्तानी’वरही शासन संभ्रमित
‘बाजीराव मस्तानी’ हा चित्रपट भाजप कार्यकर्त्यांकडून बंद पाडला जात असून शासन स्वत:च्या भूमिकेबाबत संभ्रमित आहे, तर नागपूरसह महाराष्ट्रात शासनाकडून शांततापूर्ण आंदोलनकर्त्यांवर लाठीमार केला जात असून कलावंत व वकिलांवर हल्ले होताना दिसतात. राज्याची एकंदरीत स्थिती बघितली तर राज्याची कायदा व सुव्यवस्था ढासळल्याचे दिसत असून अधिवेशनाच्या शेवटच्या तीन दिवसांत शासनाला याचा जाब विचारणार, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी विधानभवन परिसरात प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना दिली.
ते म्हणाले की, राज्य शासनाने शेतकऱ्यांची घोर निराशा केली आहे. गुंडांवर पोलिसांचा वचक नसल्याने राज्याची कायदा व सुव्यवस्था ढासळल्याचे दिसत असल्याने याचे उत्तर शासनाला द्यावेच लागेल. सोबत विदर्भ व मराठवाडय़ासह इतर भागांतील वीज, पाणी, सिंचनाच्या अनुशेषावर केलेल्या कारवाईसह मेळघाटसह काही भागांतील कुपोषणावरही शासनाला जाब विचारला जाईल. अंतिम आठवडा प्रस्तावातही यापैकी बऱ्याच बाबींचा समावेश केला गेला आहे. त्यावर राष्ट्रवादीचे गटनेते विधानसभा अध्यक्षांची भेटही घेणार आहेत. शासनाकडून सामान्य नाग्रिकांवर अन्याय होऊ नये, याकरिता शासनाकडे काँग्रेस, राष्ट्रवादीसह सगळे विरोधी पक्ष सगळे प्रश्न लावून सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे.
‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटावर पवार म्हणाले की, केंद्र व राज्यात भाजपचे सरकार आहे. तेव्हा या सरकारच्या अखत्यारित सेंसॉर बोर्ड येतो. या बोर्डाकडून परवानगी मिळाल्यावरच या चित्रपटाला मंजुरी मिळाली आहे. चित्रपटांना मनोरंजन म्हणून बघण्याची गरज असून त्यात वाद घालणे योग्य नाही. बाजीराव मस्तानीबद्दल जास्त माहिती उपलब्ध नसून ज्याने जे लिहिले त्यानुसार सामान्य नागरिक आपले मत तयार करतो. राष्ट्रवादी काँग्रेस कोणत्याही थोरपुरुषांच्या अनादराच्या बाजूने नसून प्रसंगी कुणाला चित्रपटावर आक्षेप असल्यास त्याकडे सेंसॉर बोर्डाकडे तक्रार करण्याचा विकल्प आहे. परंतु भाजपचे कार्यकर्ते ज्याप्रमाणे चित्रपट बंद करण्याचा प्रयत्न करीत आहेत व सरकार गप्प बसले आहे, त्यावरून शासनच संभ्रमित असल्याचे दिसते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Ajit pawar comment on bajirao mastani