नागपूर : शहरातील अनेक चौकांसह उड्डाणपुलांचे नियोजन चुकल्यामुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. अजनी चौक त्याचे प्रातिनिधिक उदाहरण आहे. मेट्रोस्थानक आणि पाच रस्त्यांचा योग्य मेळ बसवता न आल्याने अजनी चौक ‘अपघातप्रवण’ झाला आहे.

शहरातील सर्वाधिक व्यस्त चौकांपैकी एक असलेला हा चौक आहे. या चौकात पाच रस्ते एकत्र येतात. एक रस्ता खामल्याकडे, दुसरा अजनी रेल्वेस्थानकाकडे, तिसरा जेरिल लॉनकडे जातो. रहाटे कॉलनी-सीताबर्डीकडे आणि सोनेगाव-विमानतळाकडे जाणाऱ्या वाहनांनाही याच चौकातून जावे लागते. पाचही बाजूंनी येणाऱ्या व जाणाऱ्या चारचाकी वाहनांची वर्दळ या चौकात दिवसभर असते. त्यामुळे येथे नेहमी वाहतूक कोंडी होते. सायंकाळी तर येथून वाहन काढणे म्हणजे मोठेच आव्हान आहे. आधीच या चौकातील रस्त्यांचे नियोजन चुकले आहे. त्यात पुन्हा मेट्रो स्थानकाची भर पडली आहे. चौकाच्या समोरच उड्डाणपूल असल्यामुळे पुलाच्या डाव्या बाजूला जाणाऱ्या वाहनांमुळे चौकात वाहतूक कोंडी होते.

हेही वाचा – नगर रचना विभागाची परीक्षा दिलेल्या उमेदवारांसाठी मोठी बातमी, ‘या’ तारखेला होणार कागदपत्रांची पडताळणी

मेट्रो स्थानक अडचणीचे

अजनी चौकातील मेट्रो स्थानकामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. हे स्थानक नीरीच्या जागेवर बांधण्याचा प्रस्ताव मंजूर झाला होता. मात्र, ते नीरीच्या जागेऐवजी अजनी चौकाच्या पुढे बांधण्यात आले. स्थानकासमोरच अमर जवान स्मारक आणि त्यात भलामोठा रणगाडा ठेवला आहे. त्यामुळे चौक अरुंद झाला आहे. कारागृहाच्या लगतच सिमेंटचा त्रिकोणी भाग असून त्यावरही बांधकाम करण्यात आल्याने बराच रस्ता व्यापला गेला आहे. चौकातच माऊंट कारमेल शाळेचे मुख्य प्रवेशद्वार आहे. त्यामुळे मुलांना घेण्यासाठी आलेले पालक रस्त्यावरच वाहने उभी करतात. तसेच शाळेच्या बसेससुद्धा रस्ता व्यापून घेतात. चौकात होणाऱ्या वाहनकोंडीमुळे दुकानदारांना फटका बसत आहे. ग्राहक तेथे न थांबता पुढे जातात, असे तेथील व्यावसायिक सांगतात.

दुहेरी वाहनतळांचा त्रास

प्रतापनगराकडून अजनी रेल्वस्थानकाकडे जाण्यासाठी ‘यू-टर्न’ घ्यावा लागतो. तसेच चौकातील दुकानदारांनी स्वतःसाठी आणि ग्राहकांसाठी रस्त्यावर वाहनतळ तयार केले आहे. त्यामुळे रस्ता आणखी अरुंद झाला आहे.

‘स्कायवॉक’ म्हणजे नाकापेक्षा मोती जड

मेट्रोने प्रवास करणाऱ्यासाठी स्कायवॉक बांधण्यात आला आहे. तो मेट्रो स्थानकापासून दूर अंतरावर खाली उतरतो. त्याच्या बांधकामासाठी रस्त्याची जागा व्यापली आहे. मेट्रो स्थानकही अडचणीच्या ठिकाणी आहे. या स्थानकासाठी नीरीची जागा ठरली होती. तेथे बांधले असते तर ‘स्कायवॉक’ची गरज भासली नसती. भविष्यातील वाहनांच्या गर्दीचा अभ्यास आणि योग्य नियोजन नसल्यामुळे ‘स्कायवॉक’ जणू नाकापेक्षा मोती जड झाला आहे.

नागरिक काय म्हणतात?

अजनी चौकात मेट्रो स्टेशनचा प्रस्ताव नव्हताच. तो नीरीच्या जागेवर होता. त्यामुळे स्कायवॉकचाही खर्च वाचला असता. परंतु, प्रशासनाच्या मनमानी धोरणामुळे चौकात मेट्रोस्टेशन बांधण्यात आले. त्याचा त्रास सामान्य नागरिकांना भोगावा लागत आहे. उड्डाणपुलाचेही नियोजन चुकले. पुलाचे बांधकाम करताना लोकांच्या अडचणींचा विचार करण्यात आला नाही. पुलाचे ‘लँडिंग’ राजीव गांधी पुतळ्याजवळ केले असते तर सोयीचे ठरले असते. – नरेश सब्जीवाले, संचालक, राजहंस प्रकाशन.

प्रशासनाने अजनी चौकातील पंचरस्ता बंद केला. सौंदर्यीकरणाच्या नावावर अजनी चौक अरुंद केला. खामल्याकडे जाताना भला मोठा वळसा घेणे परवडत नाही. मेट्रो स्थानकासाठी मोठी जागा गेल्यामुळे व्यवसायावर विपरीत परिणाम झाला. येथे सिग्नलचे तीन तेरा वाजले असून कोंडी फोडण्यासाठी वाहतूक पोलीस कधीच नसतात. अजनी चौकाची समस्या सोडवण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना गरजेची आहे. पोलीस-महापालिका आणि अन्य विभागाने एकत्र येऊन यावर कायमस्वरुपी तोडगा काढायला हवा. – अजित दिवाडकर, ज्येष्ठ उद्योजक.

हेही वाचा – कंत्राटी कर्मचारी संपावर गेल्याने राज्यातील वीज यंत्रणा सलाईनवर.. ‘या’ आहेत मागण्या…

रहाटे कॉलनीकडून खामल्याकडे दुचाकी घेऊन जाताना अजनी चौक खूपच अडचणीचा ठरतो. खामल्याकडे जाणारा रस्ता कायमचा बंद करण्यात आला आहे. मेट्रो स्थानकाखालील दुभाजकाची उंची खूप मोठी आहे. दुकानात गेल्यास पार्किंगचा प्रश्न असतो. – विलास मेश्राम, वाहनचालक.

अजनी चौकातून चहुबाजूना जाणाऱ्या वाहनांची संख्या मोठी आहे. मेट्रो स्थानकही चौकासमोर असल्यामुळे प्रवाशांची गर्दी असते. या चौकातून खामल्याकडे जाणारा रस्ता पूर्ण बंद करण्यात आला आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होते. परंतु, रोज वाहतूक पोलीस कर्मचारी तैनात करून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला जातो. – जयेश भांडारकर, सहायक पोलीस आयुक्त, वाहतूक विभाग