अमरावती : ज्यांना आपले म्हणायला कोणी नव्हते, ज्यांचे आयुष्य बेवारस म्हणून सुरू झाले, त्या मूकबधिर जोडप्याच्या घरात आज आनंदाचे अश्रू आणि टाळ्यांचा गजर झाला. वझ्झर येथील स्व. अंबादासपंत वैद्य मतिमंद, मूकबधिर बालगृहात वाढलेल्या अनिल आणि वैशाली या दिव्यांग दाम्पत्याला पुत्ररत्न झाले आहे. विशेष म्हणजे, प्रसूतीदरम्यान आई आणि बाळाचा जीव धोक्यात असताना, अचलपूरच्या उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी यशस्वी ‘सिझेरिअन’ शस्त्रक्रिया करून दोघांनाही सुखरूप वाचवले.

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शंकरबाबा पापळकर यांच्या कुटुंबात आता २९ वा नातू जन्माला आला आहे, ज्यात १२ मुली आणि १७ मुलांचा समावेश आहे. वैशाली हिचा प्रवास मुंबईतील चेंबूर येथील बेवारस अवस्थेतून सुरू झाला, तर अनिल हा डोंगरी रिमांड होममध्ये होता. मुंबईच्या बाल न्यायालयाने या दोघांना अमरावती जिल्ह्यातील वझ्झर येथील शंकरबाबांच्या बालगृहात आजीवन पुनर्वसनासाठी पाठवले. ३० वर्षांहून अधिक काळ याच संस्थेच्या छत्रछायेखाली दोघे लहानाचे मोठे झाले.संस्थेने केवळ त्यांना आसराच दिला नाही, तर त्यांना जीवनसाथीही शोधून दिला. तरुण झाल्यावर ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि लग्नबंधनात अडकण्यास तयार झाले.

फेब्रुवारी २०१९ मध्ये अमरावती येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ येथे अनिल आणि वैशाली यांचा विवाह भव्य प्रमाणात पार पडला. तत्कालीन खासदार आनंदराव अडसूळ यांनी मुलीच्या वडिलांची जबाबदारी स्वीकारली, तर तत्कालीन पोलीस आयुक्त बाविस्कर यांनी वरपिता म्हणून जबाबदारी सांभाळत या दोघांचे लग्न लावून दिले. आजपर्यंत या संस्थेने तब्बल २३ अनाथ, बेवारस मुला-मुलींचे विवाह लावून दिले आहेत. लग्नानंतर अनिल आणि वैशाली यांना संस्थेने बेवारस दिव्यांग मुलांच्या सेवेसाठी नोकरीवरही ठेवले, ज्यामुळे त्यांचे जीवन आत्मनिर्भर झाले.

लग्नाच्या सहा वर्षांनंतर सौ. वैशाली यांना गर्भधारणा झाली. परंतु, नवव्या महिन्यात त्यांची प्रकृती गंभीर झाली आणि त्या फार अशक्त झाल्या होत्या. अचलपूर येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी यावेळी देवदूत म्हणून काम केले. प्रसूतीची गुंतागुंत लक्षात घेऊन, डॉ. प्राजक्ता किटुकले आणि डॉ. आनंद सुंडे यांच्या चमूने तातडीने ‘सिझेरिअन’ शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. आज दुपारी दोन वाजता हे बाळ सुखरूप जन्माला आले.

आई वैशाली आणि बाळ दोघांचेही प्राण वाचवण्यात डॉ. किटुकले आणि डॉ. सुंडे यांना यश मिळाले. यावेळी परिचारिका गायत्री, आशा सेविका ज्योती तायडे, बालगृहाच्या वॉर्डन वर्षा काळे आणि विनायकराव काकड उपस्थित होते.