पारंपरिक चित्रांना आता आधुनिकतेचा साज चढतोय. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्य़ाने प्राचीन विदेशी ‘कायनेटिक कले’तून रोबोटिक चित्र साकारले जात आहे. १९२० मध्ये सर्वप्रथम अलेक्झांडर स्कायडरने ही कला चित्ररूपाच्या माध्यमातून सादर केली. मात्र, तेव्हा त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. परंतु नागपूरच्या ध्येयवेडय़ा चित्रकाराला या कायनेटिक कलेने आपल्या प्रेमात पाडलंय अन् ही कला जिवंत ठेवण्यासाठी त्याने आपले आयुष्य पणाला लावले. आज विदर्भात ‘कायनेटिक कला’ जोपसणारा एकमेव कलावंत म्हणजे अनिरुद्ध बेले ओळखला जाऊ लागला आहे.
मुळात विज्ञान शाखेचा विद्यार्थी अनिरुद्ध बेले याला अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळाला. मात्र त्याला कला क्षेत्र खुणावत होते. कलेची आवड त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. त्यामुळे अभियांत्रिकीकडे पाठ फिरवून त्याने नागपुरातील शासकीय चित्रकला महाविद्यालयात प्रवेश घेतला. बालपणापासूनच त्याची वृत्ती चिकित्सक होती. कलेची आवड असली तरी, तंत्रज्ञानाशी तो फार घट्ट जुळलेला होता. पेंटिंग आणि तंत्रज्ञान हाच त्याने आपल्या करिअरचा मध्यिबदू ठेवला. त्यामुळे सायन्स आणि कलेचा उत्कृष्ट नमुना तो आपल्या चित्रातून साकारतो.
त्याने काढलेल्या बहुतांश पेंटिंग या तंत्रज्ञानाशी जुळलेल्या असतात. त्याच्या प्रत्येक चित्राची मध्यवर्ती कल्पना ही अत्याधुनिक आहे. अशात त्यात त्याला प्रेरणा मिळाली ही १९२० मध्ये अलेक्झांडर स्कायडरने साकारलेल्या कायनेटिक कलेची. मात्र त्याकाळी कायनेटिक कलेला पेंटिंगच्या क्षेत्रात फारसा प्रतिसाद मिळाला नाही. या कलेचे अध्ययन अनिरुद्धने करून आपल्या कल्पनेतून या कलेच्या माध्यमाने चित्रात नावीन्य सादर करण्याचा प्रयत्न सुरू केला अन् आज अनिरुद्ध त्याच्या प्रयत्नात यशस्वी ठरला. आज त्याच्या पेंटिंगला विदेशातून चांगली मागणी आहे. शिवाय अनिरुद्ध प्रदर्शनाच्या माध्यमातून लोप पावलेली कायनेटिक कला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करतो आहे. अनिरुद्धच्या शिक्षकांकडून देखील त्याला नेहमी याबाबतीत प्रोत्साहन मिळत असल्याने त्याची रूची अधिक वाढली आहे. विदर्भातून तो एकमेव कलावंत आहे जो कायनेटिक केलेला जिवंत ठेवण्यासाठी धडपडतो आहे. शिवाय त्याच्या कलेला उत्तम प्रतिसाद देखील मिळत आहे. महाविद्यालयाच्या वार्षिक कला प्रदर्शनात सर्वाना आकर्षति करणारे पेंटिंग हे अनिरुद्धचे होते. त्याच्या मते प्रत्येक चित्रकाराची शैली ही इतरांपेक्षा वेगळी असते. कुणी निसर्गाच्या विविध छटा आपल्या चित्रात टिपत असतो तर कुणी काल्पनिकता चित्रातून दर्शवत असतो. मात्र मी विज्ञान आणि तंत्रज्ञानाची जोड असलेली ‘कायनेटिक कला’ जोपासण्याचे काम प्रामाणिकपणे करतो आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पेंटिंगचे नवे तंत्र विकसित करायचे आहे
चित्र प्रदर्शनात तुम्ही बघितले असाल की अनेक चित्रप्रेमी येतात अन् चित्र बघून निघून जातात. मात्र माझ्या बाबतीत असे होत नाही. मी आजवर अनेक प्रदर्शने भरवली आहेत. मात्र आलेला प्रत्येक व्यक्ती माझ्या प्रत्येक चित्रासमोर थांबतो आणि प्रश्न विचारतो. त्यामुळे कायनेटिक कलेचा प्रचार व प्रसार होतो. माझ्या चित्रात मी ‘गेअर’ बसवलेले आहेत. माणूस पेंटिंगच्या समोर येताच सेंसारच्या मदतीने पेंटिंगवरील ‘गेअर’ आपोआप फिरायला लागतात. ते ‘गेअर’ म्हणजे ‘फ्युचरेस्टिक कॉम्प्युटर’ आहे. माझ्या पेंटिंगमध्ये तंत्रज्ञानाचा भरपूर उपयोग मी करत असतो. माझा इतरांपेक्षा वेगळे काही करण्याचा उद्देश आहे. भविष्यात मला माणूस पेंटिंगसमोर येताच स्लाईडप्रमाणे चित्र बदलण्याचे तंत्र विकसित करायचे आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ancient foreign kinetic art
First published on: 28-04-2016 at 02:19 IST