लोकसत्ता टीम

अकोला : लहान पक्षांना सोबत घेऊन ठेचून काढण्याची भारतीय जनता पक्षाची वृत्ती आहे. त्याचा थोडा-थोडा अनुभव आम्हालापण येत आहे, असे विधान प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी केले. सत्तेत सोबत सहभागी असतानाही भाजपवर शरसंधान साधल्याने कडूंच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात खमंग चर्चा होत आहे.

अकोला दौऱ्यावर शनिवारी आले असताना आमदार कडू यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ‘वापरा आणि फेका’, हे भाजपचे तत्त्व आहे. त्यामुळे मित्र पक्षांचा वापर करून भाजप त्यांना बाजूला सारतो, अशी टीका महादेव जानकर यांनी नुकतीच केली होती. सत्तेत सहभागी असलेल्या आमदार कडूंनी देखील त्यांच्या सुरात सूर मिळवत भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. आ. कडू म्हणाले, ‘‘भाजपचा थोडा-थोडा अनुभव आम्हाला येत आहे. महादेव जानकर म्हणतात त्यात तथ्य आहे. त्यांना सोबत घ्यायचे आणि ठेचून काढायचे. तोपर्यंत चलती आहे, तोपर्यंत सहन करायचे. पुढील भूमिका घेऊ. ती सांगावी लागत नाही. छत्रपतींची नीती ठेवावी लागते.’’

आणखी वाचा-वाघाच्या शिकारीबाबतचे विधान आमदार संजय गायकवाड यांना भोवले; वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उद्धव ठाकरे आणि भाजपसोबत काम करण्याचा अनुभव घेतला आहे. सर्वात चांगला अनुभव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आल्याचे आमदार कडू म्हणाले. अमरावती मतदारसंघातून लोकसभा लढवण्याचा विचार असून प्रहारकडे चार ते पाच जण इच्छूक आहेत. कार्यकर्त्यांशी बोलून उमेदवार ठरवू, असे देखील आमदार कडू यांनी सांगितले.