आशीनगर झोन सभापतीपदाची निवडणूक

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्थानिक राजकारणाचे गणित जुळवत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विचित्र आघाडी निर्माण होणे राज्याला परिचित आहे, परंतु उत्तर नागपुरातील आशीनगर झोनमध्ये अल्पमतात असलेल्या भाजपला दुप्पट संख्याबळाच्या काँग्रेसने समर्थन देऊन आश्चर्याचा धक्का दिला. सर्वाधिक सात सदस्य असलेल्या बसपला सभापतीपदापासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसने ही चाल खेळून तीन सदस्य असलेल्या भाजपला पाठिंबा दिला आहे.

महापालिकेत मिनी महापौरपद समजल्या जाणाऱ्या झोन सभापतीपदासाठी आज निवडणूक झाली. महापालिकेत तिसऱ्यांदा भाजपची सत्ता आली असून यावेळी १५१ पैकी १०८ सदस्य आहेत. त्यामुळे दहापैकी आठ झोनमध्ये बिनविरोध निवडणूक झाली. आशीनगर आणि मंगळवारी झोनमध्ये बसप आणि काँग्रेसने उमेदवार दिले होते. त्यासाठी आज निवडणूक झाली.

प्रारंभी आशीनगर झोनच्या सभापतीपदाची निवडणूक घेण्यात आली. झोन क्रमांक ९ आशीनगरमध्ये बसपचे ७, काँग्रेसचे ५ आणि भाजपचे ३ नगरसेवक आहेत. या ठिकाणी काँग्रेसच्या भावना लोणारे, भाजपच्या भाग्यश्री कानतोडे तर बसपच्या वैशाली नारनवरे यांच्यात लढत होती.

भाजपचे सर्वात कमी नगरसेवक असताना काँग्रेसच्या भावना लोणारे यांनी अर्ज मागे घेतला. काँग्रेसच्या पाच नगरसेवकांनी भाजपला मतदान केले, तर संदीप सहारे मतदान न करता तटस्थ राहिले.

कानतोडे यांना ८ तर वैशाली नारनवरेला ७ मते मिळाली. अशाप्रकारे स्थानिक राजकारणासाठी बसपला सभापतीपदापासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसने भाजपला साथ दिली.

मंगळवारी झोनमध्ये काँग्रेसने उमेदवारी अर्ज भरला नव्हता. तेथे बसपचे संजय बुर्रेवार आणि भाजपच्या सुषमा चौधरी यांच्यात थेट लढत होती. या ठिकाणी काँग्रेसचे पाच सदस्य आणि बसपचे तीन आणि भाजपचे आठ सदस्य आहेत. निवडणुकीच्या वेळी काँग्रेस सदस्यांनी अनुपस्थित राहून भाजपला सहकार्य केले. तीन सदस्य असलेल्या बसपने माघार घेतली. काँग्रेस आणि बसपने परस्परांमध्ये जुळवून न घेतल्यामुळे दोघांच्या भांडणात तिसऱ्या भाजपचा मात्र फायदा झाला आणि शहरातील दहाही झोनचे सभापतीपद भाजपला आपल्या पारडय़ात टाकणे सहज शक्य झाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp sabhapati in nagpur with the help of congress
First published on: 31-03-2017 at 00:33 IST