अमरावती : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या दिवंगत मातोश्री हीराबेन मोदी यांच्यावर आधारित कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) द्वारे तयार केलेल्या व्हिडिओच्या निषेधार्थ अमरावतीत भाजपने आज आंदोलन केले. या वेळी भाजपने काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यावर मर्यादा ओलांडल्याचा आरोप केला. राहुल गांधी यांच्या निषेधाच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या.
हा व्हिडिओ बिहार काँग्रेसने दोन दिवसांपूर्वी एक्सवर पोस्ट केला होता. त्यात पंतप्रधान मोदींच्या आई स्वप्नात येऊन त्यांना राजकारणात अजून किती घसरणार? असा सवाल करताना दाखवण्यात आले आहे.
या अपमानास्पद टीकेचा निषेध करण्यासाठी आज भाजप आणि महिला मोर्चाने अमरावतीच्या राजकमल चौकात तीव्र आंदोलन केले. केवळ तोंडी टीकाच नाही, तर कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून विविध चित्र आणि व्हिडिओ तयार करून मोदी यांची बदनामी आणि त्यांच्या दिवंगत मातोश्रींचा अपमान केला जात असल्याचा आरोप या आंदोलनात करण्यात आला.
भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष आमदार चित्रा वाघ यांच्या सूचनेनुसार आणि भाजपचे अमरावती शहर जिल्हाध्यक्ष डॉ. नितीन धांडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन झाले. महिला मोर्चाच्या अध्यक्ष सुधा तिवारी यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. यावेळी मोठ्या संख्येने भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
पंतप्रधानांच्या मातोश्रींचा हा अपमान केवळ त्यांचाच नव्हे, तर देशातील प्रत्येक आई, बहीण आणि मुलीचा अपमान आहे, असे भाजप पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. काँग्रेसने यापूर्वीही अनेकदा महिलांचा अपमान केला आहे. मात्र, देशाच्या सर्वोच्च पदावर असलेल्या व्यक्तीच्या दिवंगत आईबद्दल असे वक्तव्य करून त्यांनी आपली विकृत मानसिकता पुन्हा एकदा दाखवून दिली आहे. देशभरात निवडणुकीत पराभव होत असल्याने विरोधी पक्ष गोंधळलेल्या अवस्थेत असून, त्यामुळेच अशी निंदनीय कृत्ये त्यांच्याकडून घडत आहेत, असा आरोपही यावेळी करण्यात आला.
मोदी यांच्या दिवंगत मातोश्रींचा राजकारणाशी कधीही संबंध नव्हता. त्यांच्या कुटुंबाने कधीही आपल्या मुलाच्या सर्वोच्च पदाचा आव आणला नाही. तरीही काँग्रेस आणि मित्रपक्षांनी असे घृणास्पद कृत्य केले आहे. भाजप आणि महिला मोर्चा हे कृत्य कधीही सहन करणार नाही, असा संदेश या आंदोलनातून देण्यात आला. यावेळी जयंत डेहनकर, शिवराय कुलकर्णी, बादल कुलकर्णी, ललित समदूरकर, राधा कुरील, ॲड. प्रशांत देशपांडे, गंगा खारकर, सुरेखा लुंगारे, लता देशमुख, शीतल वाघमारे, जया माहोरे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.