नागपूर : राज्याचे ऊर्जामंत्री व नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (कामठी), तुमसरचे आमदार चरण वाघमारे आणि माजी खासदार सुरेश वाघमारे या पूर्व विदर्भात बहुसंख्येने असलेल्या तेली समाजाच्या नेत्यांना भाजपने उमेदवारी नाकारल्याने विधानसभा निवडणुकीत तेली समाजाच्या नाराजीला भाजपला तोंड द्यावे लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पूर्व विदर्भात नागपूर, भंडारा, गोंदिया आणि वर्धा जिल्ह्य़ासह इतरही जिल्ह्य़ात तेली समाजाची संख्या मोठय़ा प्रमाणात आहे. पूर्वी हा समाज काँग्रेससोबत होता. मात्र मागील काही निवडणुकांत भाजपने या समाजाच्या नेत्यांना मोठय़ा प्रमाणात प्रतिनिधित्व दिल्याने तो भाजपकडे वळला होता. त्यामुळे भाजपला  यशही मिळाले. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या स्वरूपात या समाजाला विदर्भातून राज्य मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व देण्यात आले होते.  मात्र त्यांना कामठीतून उमेदवारी नाकारण्यात आली. तसेच तुमसरचे विद्यमान आमदार चरण वाघमारे यांनाही त्यांच्यावर निवडणुकीच्या काही दिवसांपूर्वी घडलेल्या महिला पोलीस निरीक्षकांना धक्काबुक्कीच्या प्रकरणावरून उमेदवारी नाकारण्यात आली. वर्धा जिल्ह्य़ातील सुरेश वाघमारे यांनी वर्धा व देवळी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मागितली होती. मात्र त्यांना संधी नाकारली आणि देवळी हा पक्षाकडे असलेला मतदारसंघ  शिवसेनेसाठी सोडण्यात आला.

दरम्यान बावनकुळे आणि सुरेश वाघमारे यांनी पक्षाचा निर्णय मान्य केला आहे. मात्र चरण वाघमारे यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला आहे.  नाराजी समाजमाध्यमाच्या माध्यमातून आता हळूहळू प्रगट होऊ लागली आहे. याचा पक्षाला फटका बसू शकतो हे लक्षात आल्यावर भाजपचे बावनकुळे यांनी जाहीर निवेदन प्रसिद्ध करून ते पक्षावर नाराज नसल्याचे जाहीर केले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी बावनकुळे यांची पूर्व विदर्भाचे प्रचार प्रमुख म्हणून नियुक्ती केली गेली.

भाजपकडे सध्या वर्धेचे खासदार रामदास तडस आणि नागपूर पूर्वचे आमदार कृष्णा खोपडे आदी तेली समाजाचे नेते या भागात आहेत. या दोन नेत्यांवर समाजाची नाराजी दूर करण्याचा भार आहे.काँग्रेसने वर्धेतून शेखर शेंडे, पूर्व नागपूरमधून पुरुषोत्तम हजारे, राष्ट्रवादीने राजू कारेमोरे यांना तूमसरमधून उमेदवारी दिली आहे.

राज्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात गोंधळ

भंडाऱ्याचे पालकमंत्री परिणय फुके यांच्या भंडारा जिल्ह्य़ातील कार्यक्रमात रविवारी कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. या गोंधळाला फुके आणि आ. चरण वाघमारे यांच्यातील वादाची किनार आहे. फुके यांच्यामुळेच आपल्याला खोटय़ा गुन्ह्य़ात अडकवण्यात आले व उमेदवारी कापण्यात आली, असा आरोप वाघमारे यांनी केला आहे. फुके यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहे. साकोलीत मोठय़ा प्रमाणात तेली समाज आहे हे येथे उल्लेखनीय.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वावर माझा पूर्णपणे विश्वास आहे. त्यांनी मला दिलेली पूर्व विदर्भ प्रचारप्रमुखाची जबाबदारी मी सक्षमपणे पार पाडणार आहे. कार्यकर्त्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये.

      – चंद्रशेखर बावनकुळे, ऊर्जामंत्री नागपूर

भारतीय जनता पक्षात जात पाहून उमेदवारी दिली जात नाही. त्यामुळे तेली समाज पक्षावर नाराज आहे, असे म्हणणे सयुक्तिक नाही. बावनकुळे आणि सुरेश वाघमारे यांनी पक्षाचा निर्णय मान्य केला आहे. इतर बंडखोरांवर नियमानुसार कारवाई केली जाईल. 

      – उपेंद्र कोठेकर, संघटन सचिव, भाजप

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp to face anger of teli community in the assembly elections zws
First published on: 08-10-2019 at 02:28 IST