कारखान्यातील प्रकार उघड

‘कृष्णाच्या गाई वाचवा, डेअरी मुक्त बना’; ‘पेटा’चा संदेशजगातील सर्वाधिक दूध उत्पादक देश म्हणून एकीकडे अभिमान बाळगत असताना, त्या अभिमानामागचे भयावह सत्य एका छोटय़ाशा दहीहंडी सोहळयाने समोर आणले. ज्या गाई आणि म्हशींच्या भरवश्यावर ही शेखी मिरवली जाते, त्या गाई आणि म्हशींचा अभिमान या अभिमानासाठी पायदळी तुडवला जातो. देहव्यापाऱ्यात ज्याप्रमाणे मुलींना इंजेक्शन देऊन मासिक पाळी आणली जाते, त्याचप्रमाणे डेअरी कारखान्यात दुधाच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी ऑक्सिटोसिनचे इंजेक्शन दिले जाते.गाई आणि म्हशींचे आयुष्य साधारणत: १८ वर्षांंचे, पण केवळ दुधाकरिता जन्माला घातलेल्या गाईंना अवघ्या सहा किंवा सात वषार्ंतच यमसदनी धाडले जाते. प्रत्येकवेळी गर्भधारणेमुळे त्यांचे शरीर खराब होते, हे त्यामागील एक कारण आहे. भारत हा जगातील सर्वाधिक दूध उत्पादक देश आहे आणि उत्पादनाची मागणी पूर्ण करण्यासाठी कधीकाळी कौटुंबिक असलेल्या या उद्योगांची जागा डेअरी कारखान्यांनी घेतली आहे. अतिशय क्रुरपणे या कारखान्यात गाई बांधलेल्या असतात. आॉक्सिटोसिनचे इंजेक्शन देऊन अधिकाधिक दूध उत्पादनाचा प्रयत्न या कारखान्यात केला जातो. मात्र, हेच इंजेक्शन त्यांना प्रसुती वेदनेपेक्षाही भयानक वेदना देऊन जाते. या कारखान्यातील वासरांना कित्येकदा असेच सोडून दिले जाते किंवा थेट कत्तलखान्यात त्यांची रवानगी केली जाते. वासरांना लागणारे दूध ग्राहकांना विकता यावे, हे त्यामागचे कारण आहे. भारतात खास गाईंचे किंवा वासराचे मांस मिळवण्यासाठी जनावरांची पैदास केली जात नाही, तर डेअरी उद्योग हा मांस उद्योगाचा जनावरांचा प्रमुख पुरवठादार झाला आहे. २०१५ या आर्थिक वर्षांत जनावरांचे व वासरांचे २.४ दशलक्ष टन इतके मांस भारताद्वारे निर्यात करण्यात आले.
पशुमुक्त दहीहंडी
पीपल फॉर द एथिकल ट्रिटमेंट ऑफ अ‍ॅनिमल्स (पेटा) इंडिया आणि पीपल फॉर अ‍ॅनिमल्स (पीएफए) यांच्या समर्थकांच्यावतीने जन्माष्टमीनिमित्त नागपुरात पशुमुक्त (डेअरी आणि इतर प्राण्यांपासून बनविलेल्या उत्पादनांपासून मुक्त) दहीहंडी व्हेरायटी चौकातील गांधी पुतळयाजवळ साजरी करण्यात आली. डेअरी उद्योगामागील या क्रुर कार्याला नकार देण्यासाठी अधिकाधिक लोकांनी समोर यावे, याकरिता ‘पेटा’ने उभारलेल्या दहीहंडीचा प्रयोग अभूतपर्व होता. या जन्माष्टमी सोहळयातून डेअरी वगळून गाईवर दया दाखवण्यासाठी कृष्णाच्या भक्तांना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित सोहळयात ‘कृष्णाच्या गाई वाचवा, डेअरी मुक्त बना’ असा फलक असणाऱ्या प्रतिकात्मक गाई माणसांच्या मनोऱ्याच्या शेजारी उभ्या होत्या. ‘पेटा’च्या समर्थकांनी भगवान कृष्णाच्या वेळात मनोरा रचून पशुमुक्त दहीहंडी फोडली.