नागपूर : स्पर्धा परीक्षार्थींच्या आंदोलनाची दखल घेत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) परीक्षा वर्णनात्मक स्वरूपाने घेण्याचा निर्णय २०२५ पासून लागू करण्याची घोषणा केली होती. त्यानंतरही विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम होता. मात्र आता २०२५पासून राज्यसेवा परीक्षा वर्णनात्मक पद्धतीनेच होईल, ही बाब स्पष्ट झाली आहे.

एमपीएससीने जून २०२२ मध्ये परीक्षेची पद्धत व अभ्यासक्रमामध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्याचा निर्णय घेतला. बदलाची अंमलबजावणी २०२३ पासून होणार होती. वर्णनात्मक स्वरूपाच्या प्रश्नपत्रिका, मुलाखत आणि लेखी परीक्षा मिळून २ हजार २५ गुण असे सुधारित योजनेचे स्वरूप होते. मात्र, एका वर्षात परीक्षेत मोठ्या बदलांस विद्यार्थ्यांनी विरोध केला. पुण्यासह अनेक ठिकाणी आंदोलने झाल्यानंतर शासनाने ‘एमपीएससी’ला पत्र लिहिले. त्याची दखल घेत ‘एमपीएससी’ने परीक्षेचे वर्णनात्मक स्वरूप २०२५ पासून लागू करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, काही विद्यार्थ्यांकडून समाजमाध्यमांवर यासंदर्भात संभ्रम निर्माण केला जात होता. त्यानंतर काही परीक्षार्थींनी माहिती अधिकाराचा वापर करून आयोगाकडे स्पष्टीकरण मागितले. यात २०२५ पासूनच वर्णनात्मक पद्धत लागू होईल, असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना नव्या पद्धतीनुसार अभ्यास करावा लागणार आहे.

हेही वाचा >>>बुलढाणा : चालकाचे नियंत्रण सुटले अन् भरधाव ‘स्कॉर्पिओ’ उलटली, भीषण अपघातात एक ठार, चार जखमी

उच्च न्यायालयात शपथपत्र

परीक्षा पद्धतीसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अनेक याचिका दाखल झाल्या आहेत. यावर आयोगाने दिलेल्या शपथपत्रातही कायदा व सुव्यवस्था आणि अभ्यासासाठी लागणारा वेळ या बाबी लक्षात घेऊन २०२५ पासून नवी पद्धती लागू करण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

आयोगाने हा निर्णय आधीच जाहीर केला असून यासंदर्भात योग्यवेळी पुन्हा विद्यार्थ्यांना सूचना देण्यात येतील. – डॉ. सुवर्णा खरात, सचिव, एमपीएससी