* तीन महिन्यात तब्बल २० मुले सापडली
*’ रेल्वे गस्ती पथकाकडून पालकांकडे सुपूर्द
शहरी वातावरणाची चमकधमक, टीव्ही, चित्रपट मालिकांचा प्रभाव याचा समान्य कुटुंबातील अल्पवयीन मुलांमुलींवर विपरीत परिणाम होत असून प्रेमप्रकरण आणि इतरही क्षुल्लक कारणांमुळे ते घर सोडत असल्याचे निदर्शनास येत आहे. गत तीन महिन्यात ९ मुली आणि ११ मुले असे एकूण २० जण रेल्वेस्थानकावर आढळून आली असून पोलिसांनी त्यांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले आहे. ही सर्व मुले सर्वसाधारण आणि गरीब कुटुंबातील आहेत.
क्षुल्लक कारणापोटी ही मुले घर सोडतात, शहरात येतात आणि पैसे संपले की वणवण भटकतात, त्यांच्या या असाह्य़ अवस्थेचा मग काही समाजकंटक आपल्या स्वार्थासाठी वापर करतात. रेल्वेस्थानक परिसरात फिरणारे असामाजिक घटक खेडय़ापाडय़ातून आलेल्या, गरीब मुलींना हेरून आपल्या जाळ्यात ओढतात. त्यांच्याकडून अवैध कामे करवून घेतात, लहान मुलांकडून गुन्हेगारी कृत्य करूवून घेतले जाते. साधूच्या वेशातील गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक लहान मुलांकडून गांजा विक्री करतात, असे आढळून आले आहे.
रेल्वे सुरक्षा दलाच्या महानिरीक्षकांनी सर्व विभागीय सुरक्षा आयुक्तांना रेल्वे स्थानकावर एकटे-दुकटे मुलं, मुली फिरत असल्याचे लक्षात येतात. त्यांच्यावर पाळत ठेवण्याचे आदेश दिले. त्यानुसार रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी गस्त वाढवली आणि त्यांना तीन महिन्यात तब्बल ९ मुली आणि ११ मुले सापडली. यामध्ये काही प्रेम प्रकरणातून पळून आलेल्या मुली आहेत तर काही मुल-मुली घराच्या मंडळींनी रागावल्यामुळे घर सोडले होते. इतवारी रेल्वे स्थानकावर ३० एप्रिलला १६ वर्षीय मुलगी आढळून आली. रेल्वे सुरक्षा दलाने त्या मुलीची चौकशी केली आणि स्वयंसेवी संस्थेच्या स्वाधीन केले. अशाप्रकारचे गोंदिया, इतवारी, तुमसर राजनांदगाव रेल्वे स्थानकावर आढळलेल्या ५ ते १८ वयोगटातील मुली-मुलींना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

साधारणत: घरातून पळून आलेला मुले गणवेशातील जवानांना पाहून घाबरतात आणि पळून जातात. काही मुले रडायला लागतात. त्यांच्याकडील पैसे संपलेले असते, त्यांना चूक कळलेली असते. घरी परत जाण्यासाठी त्यांना मदत हवी असते. भरकटलेल्या अशा मुलांना वेळीच पालकांच्या स्वाधीन केल्यास पुढचा अनर्थ टळतो,
– रमेश सरकाटे, विभागीय सुरक्षा आयुक्त (दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे)

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Childrens leaving home without proper reason
First published on: 07-06-2016 at 05:36 IST