भंडारा : भाजप सरकारने बहुमताचा उपयोग हा अनुच्छेद ३७० हटवण्यासाठी केला, तिहेरी तलाक हटवण्यासाठी केला. संविधान बदलण्यासाठी आम्ही बहुमताचा उपयोग करणार नाही. आम्ही संविधानाचा सन्मान करत राहणार, त्याला अधिक मजबूत करत जाणार, असे प्रतिपादन  केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले. काँग्रेसने बाबासाहेबांना पराभूत केले, त्यांचा सातत्याने अवमान केला, असा आरोपही त्यांनी केला.

भंडारा-गोंदिया मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांच्या प्रचारार्थ साकोली तालुक्यातील सेंदुरवाफा येथे आयोजित सभेत शहा यांनी काँग्रेसवर टीका केली.  उद्धव ठाकरे आणि शरद पवार म्हणतात की, त्यांचा पक्ष भाजपमुळे फुटला. मात्र, मी त्यांना सांगू इच्छितो की, त्यांचा पक्ष आम्ही फोडला नाही तर उद्धव ठाकरे यांच्या पुत्रमोहामुळे आणि शरद पवार यांचा पक्ष त्यांच्या पुत्रीमोहामुळे फुटला. या पक्षांनी केवळ स्वत:चा आणि कुटुंबाचा फायदा पाहिला. आता महाराष्ट्रात अर्धी झालेली ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीबरोबरच काँग्रेस पक्षदेखील अर्धा झालेला आहे. त्यामुळे हे पक्ष राज्याचा विकास करूच शकत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी पक्षच या राज्याचा विकास करू शकेल, असेही शहा म्हणाले.

हेही वाचा >>>नागपूर : अनैतिक संबंधामुळेच घडले हत्याकांड, तिघांवर एकाच ठिकाणी अंत्यसंस्कार

शरद पवारांवर टीका

केंद्रात कृषिमंत्री असताना शरद पवार यांनी दहा वर्षांत महाराष्ट्राला १ लाख ९१ हजार कोटींचा निधी दिला, तर मोदींच्या दहा वर्षांच्या काळात ७ लाख १५ हजार कोटींचा निधी मिळाला. रस्त्यांच्या विकासाठी २ हजार कोटींचा निधी केंद्र सरकारने दिला. त्यामुळे या देशाचा आणि राज्याचा विकास मोदींच्या नेतृत्वाखालीच होईल, असा विश्वास जनतेलादेखील आहे, असे म्हणत शहा यांनी काँग्रेससह शरद पवारांवरही हल्लाबोल केला. पंतप्रधान मोदी यांनी गेल्या दहा वर्षांत देशाला सुरक्षित व समृद्ध केले. नक्षलवाद संपवण्याचे कामही त्यांच्याच काळात झाले, असेही शहा म्हणाले.