जग बहुअंगी बदलतय, ते ‘ग्लोबल व्हिलेज’ झालय, असे म्हणत असतानाच स्थानिक पातळीवरच नव्हे जागतिक परिप्रेक्ष्यात ‘विवाहबाह्य़ संबंध’ ही समस्या उफाळून वर येत आहे. ही समस्या लक्षवेधी ठरत आहे. नागपुरातील वेगवेगळ्या समुपदेशन केंद्रावरही विवाहबाह्य़ संबंधांच्या बळी ठरलेल्या किंवा त्याचे परिणाम भोगाव्या लागणाऱ्यांची गर्दी होऊ लागली आहे.
पोलीस ठाणे किंवा कौटुंबिक न्यायालय किंवा इतरही ठिकाणी समुपदेशनासाठी येणाऱ्या महिला किंवा पुरुष यांना नवरा किंवा बायकोचे विवाहबाह्य़ संबंध, त्यांच्यामुळे घरात होणारी मुलांची आबाळ, आर्थिक टंचाई, व्यक्तीच्या मानसिकतेवर होणारा परिणाम आणि सर्वात महत्त्वाचे ‘मला डावलले जाते’ हा भाव व्यक्तीच्या मनात असल्याने असे लोक समुपदेशकांकडे येतात किंवा पाठवले जातात. पूर्वीही समुपदेशन व्हायचे, ते सासू-सुनेतील भांडणे, नवरा मारतो, तो दारू पितो, घरात पैसे देत नाही, बायको नांदत नाही, ती घर सोडून गेली, मुलांचे करत नाही या समस्यांना घेऊन व्यक्ती समुपदेशकाकडे व्यक्ती येत असत. मात्र, बदलत्या जीवनशैलीत ‘विवाहबाह्य़ संबंधां’विषयी समुपदेशकांना बोलावे लागत असल्याचा अनुभव काही समुपदेशकांनी बोलून दाखवला.
स्त्रीवादी चळवळीची सैद्धांतिक मांडणी करणाऱ्या अ‍ॅड. सुहासिनी साखरे म्हणाल्या, ही जागतिक समस्या असून ते अनादी काळापासून सुरू आहे. त्याचे बळी पहिला जोडीदार म्हणजे स्त्री-पुरुष दोन्ही आणि मुले ठरत आहेत. त्यांना वाटत असते की आईने बाबांना आणि बाबांनी आईला प्राधान्य द्यावे. मात्र, ही कौटुंबिक रचना कुठल्याही कारणाशिवाय तुटते म्हणजे घटस्फोट किंवा मोठे वाद यात घडत नसताना विवाहबाह्य़ संबंध सुरू असतात. परिस्थितीतील बदल मुलांच्या लवकर लक्षात येतात. कारण त्यांची सुरक्षा, अस्तित्व, जगणे मोठय़ांवर अवलंबून असते. ही समस्या नवीन नाहीच. मध्यम किंवा उच्च मध्यमवर्गीय महिला अर्थार्जनासाठी मोठय़ा संख्येने बाहेर पडू लागल्याने त्यांचे असणे, कृती, त्यांचे पद, कौटुंबिक पाश्र्वभूमी, चुका लगेच लक्ष वेधतात. महिलांशी किंवा महिलांद्वारे गैरवर्तवणूक करण्याची संधी हल्ली जास्त मिळते. जात किंवा समुदायाच्या कक्षांच्या बाहेर लोक पडत असल्याने ‘लोक काय म्हणतील’ हा प्रश्नही दुय्यम ठरत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विवाहबाह्य़ संबंध एक ‘समस्या’!
विवाहबाह्य़ संबंध ही समस्या यासाठी मानावी लागेल कारण त्यात एक निष्पाप व्यक्ती असते. ती किंवा तो. त्याचबरोबर त्यांची मुलेही कधीकधी या संबंधांचे बळी असतात, म्हणूनच समाजशास्त्र किंवा मानववंश शास्त्रज्ञ या संबंधाला समस्या मानतात. कारण त्यावर कोणतेही सामाजिक नियंत्रण नाही आणि व्यक्तीच्या आयुष्यावर त्याचा परिणाम होत असतो. समुपदेशकांकडे पूर्वी विवाहबाह्य़ संबंधांच्या तक्रारींऐवजी मारणे, लक्ष न देणे, दारू पिणे, पैसे न देणे या घेऊन महिला यायच्या. मात्र, तो बाहेर काय करतो, याविषयी त्या फारशा जागरुक नव्हत्या किंवा त्यांना ते दुय्यम वाटायचे. आता महिलांचा समाजातील वावर वाढल्याने त्यांच्याशी किंवा त्यांच्याद्वारे होणारे गैरवर्तन लगेच टिपले जाते, त्यामुळेच विवाहबाह्य़ संबंध ही समस्या जागतिक स्तरावर उफाळून आली आहे.

भारतीय स्त्रीशक्तीच्या राज्य सरचिटणीस माधुरी साकुळकर म्हणाल्या, हल्ली सर्वच क्षेत्रामध्ये ‘विवाहबाह्य़ संबंध’ दिसून येतात. खास करून आयटी क्षेत्रातील लोक समुपदेशन केंद्राकडे मोठय़ा प्रमाणात येत आहेत. महिलांचे बाहेर पडणे, नोकरी करणे, स्त्री-पुरुष एकत्र काम करणे, त्यांच्यात होणारे संवाद यामुळे हे प्रमाण वाढले आहे. या प्रकरणांवर हल्ली जास्त समुपदेशन करावे लागते. एवढेच नव्हे तर महिला आयोगाने जिल्हावार घेतलेल्या सुनावणी दरम्यान एका पॅनलवर काम करीत असतानाही याची अनेक उदाहरणे समोर आली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Counselors get more complaints on live in relationship
First published on: 24-08-2016 at 03:02 IST