बचावासाठी आल्याने दुसऱ्यालाही संपवले; दुहेरी हत्याकांडातील आरोपीची कबुली
नागपूर : मंजूषा नाटेकर (पत्नी) सतत मारहाण करून अपमानित करायची. त्यामुळे तिची हत्या केली आणि तिच्या बचावासाठी आलेले मामेसासरे अशोक काटे यांनाही संपवल्याची कबुली दत्तात्रयनगर मधील दुहेरी हत्याकांडाचा आरोपी जयंत नाटेकर याने पोलिसांना दिली. न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ११ फेब्रुवारीपर्यंत त्याची पोलीस कोठडीत रवानगी केली.
भारतीय ज्ञानपीठ प्राथमिक शाळेत मंजूषा या मुख्याध्यापिका होत्या, तर जयंत व्होल्टास कंपनीत होता. त्याने स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर पती-पत्नीत नेहमीच वाद होत असे. मंजूषा पती जयंतला मारहाण करून अपमानित करायची. सोमवारी दोघांमध्ये वाद झाला. मंजूषा यांनी मारहाण केल्यामुळे संतप्त झालेल्या जयंतने मंजूषा यांचा गळा आवळला व नंतर चाकूने वार केले. त्यात मंजूषा यांचा मृत्यू झाला. दरम्यान, मंजूषा यांच्या बचावासाठी धावलेल्या अशोक यांचाही जयंतरावने गळा आवळून खून केला. दोघांची हत्या केल्यानंतर काही वेळ टीव्ही बघितल्यावर जयंत घराला कुलूप लावून पसार झाला.
दोन दिवसांपासून मंजूषा शाळेत न आल्याने एका शिक्षकाने त्यांचे भाऊ राजू खनगने यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधून विचारणा केली. तेव्हा राजू हे मंजूषा यांच्या घरी गेले. कुलूप उघडले असता त्यांना दोघांचे मृतदेह दिसले. त्याने आरडाओरड केल्यावर एका नागरिकाने पोलिसांना माहिती दिली. याप्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी जयंतच्या भ्रमणध्वनी टॉवरचे लोकेशन तपासले असता तो रेल्वेस्थानकावर असल्याचे समोर आले. पोलिसांनी तेथून आरोपी जयंतला अटक केली. प्राथमिक तपासात आरोपीने हा घटनाक्रम पोलिसांना सांगितला. घटनेनंतर तो दोन दिवस मित्राकडे राहिला व बुधवारी रात्री अजमेरला जाण्यासाठी रेल्वे स्थानकावर आल्याचे त्याने सांगितले.