अनिल कांबळे

नागपूर : केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत (यूपीएससी) घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेत तीनदा अपयश आल्यामुळे खचलेल्या २८ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना मंगळवारी जरीपटक्यात घडली. ब्लेसन पुद्दू चाको (देविका-मधुर अपार्टमेंट, जरीपटका) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्लेसन चाको हा अभ्यासात अतिशय हुशार होता. त्याचे वडील व्यावसायिक आहेत. त्यांनी मुलाला शिक्षणासाठी बाहेरगावी पाठवले. बी.टेक. पूर्ण केल्यानंतर त्याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेची तयारी सुरू केली होती. त्यासाठी त्याने अथक परिश्रम घेतले होते. परंतु, त्यानंतरही तो तीनदा परीक्षा उत्तीर्ण होऊ शकला नाही. त्यामुळे तो नैराश्यात गेला. मागील काही दिवसांपासून त्याच्या वागण्यात बदल झाला होता. त्या बदलांकडे कुटुंबीयांचे लक्ष गेले नाही. काही मित्रांनी त्याच्याशी बोलून पुन्हा तयारी करण्याचा सल्ला दिला. मित्रांशी बोलताना त्याने स्पर्धा परीक्षेत येत असलेल्या अपयशाबाबत मनातील खंतही बोलून दाखवली होती. तो तणावात होता. रविवारी सकाळी वडील चर्चमध्ये गेल्यावर त्याने चादरीने छताच्या पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. वडील घरी आल्यानंतर त्यांनी दरवाजा ढकलला असता ब्लेसन हा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यांनी स्वतःला सावरत शेजाऱ्यांना आवाज दिला. याप्रकरणी जरीपटका पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. गळफास घेण्यापूर्वी त्याने वडिलांना मोबाईलवर ‘बाबा स्वत:ची काळजी घ्या, मला माफ करा’ असा संदेश पाठवला.