नागपूर : लोकसभेच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात मतदानाच्या दिवशी निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या टक्केवारीत तब्बल ११ दिवासांनी वाढ करण्यात आली. डिजिटल भारतात निवडणूक आयोगाकडून ही चूक झाली की यात मतदानाच्या टक्केवारीत वाढ करुन सरकारच्या दबावाखाली निवडणूक आयोग काही घोळ तर करीत नाही ना ? डिजिटल युगात मतदानाचा टक्का वाढलाच कसा ? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार )चे नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उपस्थित करुन निवडणूक आयोगाने ११ दिवसानंतर जाहीर केलेल्या टक्केवारीवर शंका उपस्थित केली आहे.
यापूर्वी निवडणूक आयोगाकडून मतदानाच्या दिवशीच रात्री उशिरापर्यत एकूण टक्केवारी किती झाली याची माहिती प्रसिद्ध करीत होते. यात प्रामुख्याने किती मतदार होते आणि किती मतदारांनी मतदान केले यासह टक्केवारी जाहीर करीत होते. लोकसभेच्या महाराष्ट्रात झालेल्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात मिळून १३ मतदारसंघामध्ये मतदान झाले आहे. त्यावेळी सायंकाळी ७ वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार सरासरी ५९.५६ टक्के मतदान झाल्याचे निवडणूक आयोगानेच आपल्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केले होते. परंतु आता यात वाढ करुन या तेराही मतदारसंघातील अंतीम आकडेवारी ही ६२.७१ टक्के जाहीर करण्यात आली. साधारणता ३.०८ टक्के यात वाढ दाखविण्यात आली.
हेही वाचा – सुट्टीचे आदेश असतानाही भंडारा शहरातील शाळा सुरूच, शासन परिपत्रकाची पायमल्ली
हेही वाचा – नागपूर : पती-पत्नीला दुकान सांभाळायला दिले, पण रोज जमा होणाऱ्या पैशांमुळे…
नागपूर वगळता सर्वच ठिकाणी टक्केवारीत वाढ दाखविण्यात आली आहे. चंद्रपूर येथे तर सुरुवातीला ६०.३५ असलेली टक्केवारी ही ७.२० टक्याने वाढवून ती ६७.५५ दाखविण्यात आली आहे. असाच प्रकार महारष्ट्रात पहिल्या व दुसऱ्या टप्यात झालेल्या तेराही मतदारसंघात दिसून येत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेल्या या टक्केवारीमुळे निवडणूक आयोगाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. निवडणूक आयोगावर केंद्रातील सरकारचा दबाव असल्याचे अनेक उदाहरण समोर आले आहेत. यात आता हा टक्केवारीचा घोळ समोर आला आहे. निवडणूक आयोगाने भाजपाचे उमेदवार विजयी करण्यासाठी तर हा घोळ तर केला नाही ना ? असा प्रश्न अनिल देशमुख यांनी उपस्थित केला आहे.