अमरावती : भारतात यापूर्वी कधीही न आढळून आलेल्‍या ग्रीन लिंक्‍स कोळी (स्‍पायडर) प्रजातीची ओळख पटविण्‍यात दर्यापूर येथील जे.डी.पाटील सांगळूदकर महाविद्यालयातील संशोधक प्राचार्य डॉ. अतुल बोडखे यांना यश प्राप्‍त झाले आहे. कोळीची ही प्रजाती राजस्थान मधील चुरू जिल्ह्यातील ताल छापर वाईल्ड लाईफ अभयारण्य मधून निर्मला कुमारी यांनी शोधली होती. या प्रजातीची ओळख पटविण्याचे काम दर्यापूर येथील आधुनिक कोळी संशोधन प्रयोगशाळेमध्‍ये करण्यात आले. राजस्थान मधील ताल छापर या क्षेत्रावरून ग्रीन लिंक्स कोळी प्रजातीचे शास्‍त्रीय नाव ‘पिऊसेटिया छापराजनिर्विन’ असे ठेवण्‍यात आले आहे. या नवीन प्रजातीवर प्राचार्य डॉ.अतुल बोडखे यांनी संशोधन केले आहे.

हेही वाचा : फासेपारधींच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणाऱ्या मतिन भोसलेंचा सन्मान, राष्ट्रसंत शिक्षण सेवा पुरस्काराने गौरव

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ही प्रजाती बाभूळ वृक्षांच्‍या हिरव्या पानांवर आढळते. या कोळ्याचे मागील पाय लांब असतात. त्यामुळे या फिरण्याची गती जास्त असते. तो छोट्या कीटकांना आपले भक्ष्‍य बनवतो. त्याचबरोबर मोठ्या कीटकांना सुद्धा फस्‍त करतो आणि जगलाचे संवर्धन करतो. तसेच हा निशाचर कोळी आहे. तो जंगलामधील हिरव्या झुडपांमध्ये लपून बसतो, अशी माहिती डॉ. अतुल बोडखे यांनी दिली. राजस्‍थानमधील कोळी संशोधक निर्मला कुमारी या संशोधक विनोद कुमारी यांच्या मार्गदर्शनात राजस्थान विद्यापीठ, जयपूर येथे संशोधनाचे कार्य करीत आहेत. सर्वेक्षणादरम्‍यान निर्मला कुमारी यांना ही प्रजाती ताल छापर अभयारण्यात आढळून आली. हे संशोधन आफ्रिकेतील सर्केट या शोधपत्रिकेमध्ये प्रसिद्ध झाले आहे. या संशोधनाबद्दल श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख तसेच शिवपरिवाराने डॉ. अतुल बोडखे आणि त्‍यांच्‍या चमूचे अभिनंदन केले आहे.