नागपूर महापालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी सुरेश भट सभागृहात ५२ प्रभागांतील महिलांच्या अनुसूचित जाती, जमाती व सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षणाची सोडत काढली. २०११ च्या लोकसंख्येनुसार प्रभागांमधील अनुसूचित जाती, जमातींची संख्येच्या आधारावर आरक्षण काढण्यात आले. महिलांसाठी ५० टक्के आरक्षण असून यातून अनुसूचित जाती, जमाती व सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षण काढण्यात आले.

तीन सदस्यीय प्रभागात १६ प्रभागात प्रत्येकी एक जागा अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी आरक्षित निघाली. सहा जागा अनुसूचित जमातीसाठी आरक्षित करण्यात आले. ५६ जागा सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या. या आरक्षण सोडतीत काहींना दिलासा मिळाला असला, तरी मागील पाच वर्षे सत्तेत असलेले भाजपामधील माजी महापौर दयाशंकर तिवारी यांच्या २३ क्रमांकाच्या प्रभागात सर्वसाधारण प्रवर्गात दोन महिला व एक पुरुष असे आरक्षण निघाले आहे.

प्रभाग क्रमांक २३ मध्ये भाजपा नगरसेवकांची अडचण

जुन्या चार सदस्यीय प्रभाग क्रमांक २३ मधून माजी नगरसेवक ॲड. संजय बालपांडे व दयाशंकर तिवारी निवडून आले होते. आता एकच पुरुष आरक्षण असल्याने माजी महापौर तिवारी किंवा ॲड. बालपांडे यांना स्वतःचा प्रभाग सोडून इतरत्र लढावे लागणार आहे. या दोघांत कोण हा प्रभाग सोडतो, याबाबत उत्सुकता आहे. तसेच माजी महापौर प्रवीण दटके यांचा प्रभागात दोन महिला व एक पुरुष असे आरक्षण निघाले. त्यामुळे या प्रभागात चुरस आहे.