|| देवेश गोंडाणे

‘एमपीएससी’च्या ढिसाळ नियोजनाविरोधात उमेदवारांमध्ये रोष

नागपूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकाऱ्याच्या ७४ पदांसाठी मुख्य परीक्षा होऊनही चार महिन्यांपासून ७५० उमेदवार अद्यापही निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. जानेवारी २०२० पासून सुरू असलेल्या या भरतीची प्रक्रिया अद्याप पूर्ण न झाल्याने आयोगाच्या ढिसाळ नियोजनाविरोधात उमेदवारांमध्ये रोष आहे. आयोग कुठल्याही परीक्षांचा कालबद्ध कार्यक्रम आखू शकत नाही का? असा सवालही उपस्थित केला जात आहे.

 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्गाच्या ७४ पदांकरिता मार्च २०२० मध्ये पूर्वपरीक्षा घेण्यात आली. पाच महिन्यांनंतर ऑगस्ट २०२० मध्ये या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. त्यानंतर सप्टेंबर २०२१ मध्ये या ७४ पदांसाठी पूर्व परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांची मुख्य परीक्षा घेण्यात आली. मात्र, या परीक्षेला चार महिने होऊनही अद्याप मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आलेला नाही. जानेवारी २०२० मध्ये सुरू झालेल्या भरती प्रक्रियेला दोन वर्षे उलटूनही साध्या मुख्य परीक्षेचा निकालही अद्याप जाहीर करण्यात न आल्याने आयोगाच्या कुठल्याही परीक्षेला कालबद्ध कार्यक्रम नाही का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर राज्य आयोगाने काम करावे अशी अपेक्षा विद्यार्थ्यांकडून केली जाते. दोन्ही आयोगाच्या नियमावली आणि रचनाही जवळपास सारखी असते. मात्र, केंद्रीय लोकसेवा आयोग आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा कार्यक्रमांमध्ये प्रचंड तफावत दिसून येते.

राज्य आयोगाच्या कुठल्याही परीक्षेचा कालबद्ध कार्यक्रमच नसल्याने परीक्षा देणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांना याचा फटका बसतो आहे.

आयोगाच्या अशा ढिसाळ नियोजनाविरोधात अनेकदा विद्यार्थी संघटनांकडून आंदोलन केले जाते. राज्य सरकारकडूनही आयोगाला सक्षम करण्याच्या बाता मारल्या जात असल्या तरी आयोगाकडून परीक्षा, निकाल आणि नियुक्तीच्या प्रक्रियेमध्ये कुठलीही वेळ पाळली जात नसल्याने दिवाणी न्यायाधीशसारख्या महत्त्वाच्या पदांसाठी उमेदवार दोन वर्षांपासून प्रतीक्षेतच आहेत. यासंदर्भात विचारणा करण्यासाठी आयोगाच्या अधिकाऱ्यांना संपर्क केला असता उत्तर दिले नाही. 

७० दिवसांच्या नियमांचा भंग

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

परीक्षेनंतर ७० दिवसांच्या आत निकाल जाहीर होणे अपेक्षित असते. दिवाणी न्यायाधीश पदासाठी २५ सप्टेंबर २०२१ मध्ये मुख्य परीक्षा घेण्यात आली. त्यामुळे परीक्षा होऊन १२० दिवसांहून अधिकचा कालावधी होऊन अद्यापही निकाल जाहीर करण्यात आलेला नाही. निकालच जाहीर न झाल्याने मुख्य परीक्षा देणारे जवळपास ७५० उमेदवार आजही प्रतीक्षेतच आहेत. विशेष म्हणजे, दिवाणी न्यायाधीश पदासाठी मुख्य परीक्षेनंतर मुलाखतही घेतली जाते. त्यामुळे ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होण्यास अजून सहा महिन्यांचा अवधी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.