महेश बोकडे, लोकसत्ता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर : राज्यात जोरदार पावसामुळे १२ जुलै २०२२ रोजी विजेची मागणी १७ हजार ५०६ ‘मेगावॅट’पर्यंत खाली आली होती. आता पाऊस ओसरण्यासह विदर्भासह इतरही काही भागात चांगले ऊन पडत असल्याने मंगळवारी विजेची मागणी ४ हजार २४२ मेगावॅटवरून २१ हजार ७४८ ‘मेगावॅट’पर्यंत वाढली आहे.

महानिर्मितीच्या ‘स्टेट लोड डिस्पॅच सेंटर’च्या माहितीनुसार, २ ऑगस्ट २०२२ रोजी दुपारी ३.१० वाजता राज्यात विजेची मागणी २१ हजार ७४८ मेगावॅट होती. त्यातील १२ हजार १२ ‘मेगावॅट’ची निर्मिती राज्यात होत होती, तर केंद्राच्या वाटय़ातील राज्याला ९ हजार ६०५ ‘मेगावॅट’ मिळत होते. राज्यात निर्मित होणाऱ्या विजेपैकी सर्वाधिक ५ हजार ५७५ ‘मेगावॅट’चे उत्पादन महानिर्मितीच्या विविध कोळसा, जलविद्युत, गॅस, सौर ऊर्जा प्रकल्पातून होत होते. तर अदानी, जिंदाल, आयडियल, रतन इंडियासह इतर खासगी कंपन्यांकडून ५ हजार ५४५ ‘मेगावॅट’ वीज मिळत होती.

१२ जुलै २०२२ रोजी राज्यात विजेची मागणी १७ हजार ५०६ ‘मेगावॅट’ होती. त्यातील ४ हजार ८०७ ‘मेगावॅट’ विजेचे उत्पादन महानिर्मितीच्या विविध कोळसा, जलविद्युत आणि गॅस प्रकल्पातून केले जात होते. तर इतर वीज केंद्राच्या वाटय़ासह इतर स्त्रोतांकडून घेतली गेली. दरम्यान, राज्यात २७ एप्रिल २०२२ रोजी २७ हजार ३४७ ‘मेगावॅट’ची मागणी होती. तर यावेळी राज्यात १७ हजार ९७३ ‘मेगावॅट’ची निर्मिती होत होती. तर इतर वीज इतर स्त्रोतांकडून घेऊन भारनियमन टाळण्याचे प्रयत्न महावितरणसह इतर वीज वितरण कंपन्यांकडून केले गेले. मागील आठवडय़ापासून राज्याच्या तापमानात झालेल्या वाढीने सर्वत्र पंखे, वातानुकूलित यंत्राचा वापर पुन्हा वाढला आहे. राज्यातील अनेक भागात पूर ओसरल्याने पुन्हा उद्योगांसह व्यवसायिक प्रतिष्ठाने पूर्ववत होत आहेत. विजेचा वापर वाढल्याचा अंदाज वीज क्षेत्रातील जाणकार वर्तवत आहे. विजेची मागणी वाढल्याच्या वृत्ताला महावितरणच्या एका अधिकाऱ्याने दुजोरा दिला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Demand for electricity increases after rain stopped zws
First published on: 03-08-2022 at 04:11 IST