अशोक सिंघल यांना केवळ आंदोलनापुरते सीमित न ठेवता त्यांनी विविध जाती धर्म, पंथातील लोकांना आणि धर्मगुरूंना एकत्र आणून हिंदू समाज संघटित करण्याचा प्रयत्न केला आहे. संघटित समाज आणि मजबूत राष्ट्रनिर्मिती निर्माण करणे हीच अशोक सिंघल यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
विश्व हिंदू परिषदेचे अशोक सिंघल यांचे नुकतेच निधन झाले. त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मुंडले सभागृहात शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. अंजनगाव सुर्जीच्या देवनाथ मठाचे जितेंद्रनाथ महाराज यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ उत्तर क्षेत्र संघचालक बजरंगलाल गुप्ता, माजी खासदार बनवारीलाल पुरोहित, प्रमिला मेढे, चित्रा जोशी, श्रीराम जोशी, प्रशांत हरताळकर, डॉ. विलास डांगरे, खासदार अजय संचेती आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी विविध संघटनेच्या सदस्यांनी भावना व्यक्त करून अशोक सिंघल यांना श्रद्धांजली अर्पण केली.
अशोक सिंघल यांच्याविषयी भावना व्यक्त करताना फडणवीस म्हणाले, देशातील कोटय़वधी युवकांना राष्ट्रभक्तीची त्यांनी प्रेरणा दिली. धर्मजागरण किंवा मंदिरासाठी त्यांनी आंदोलने केली असली तरी त्यांना आंदोलनापुरते सीमित न ठेवता त्यांनी हिंदू समाज संघटित करण्यासाठी आयुष्यभर काम केले. धर्मसंसदेच्या माध्यमातून त्यांनी सर्व धर्म आणि पंथातील संतांना एकाच व्यासपीठावर आणून हिंदू समाजाचे दर्शन घडविले. राष्ट्रभक्ती निर्माण करण्यासाठी संघटन कसे मजबूत करावे, असा त्यांनी मार्ग दाखविला असून या मार्गाने जाणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
यावेळी बजरंगलाल गुप्ता, प्रशांत हरताळकर, बनवारीलाल पुरोहित, चित्रा जोशी, श्रीराम जोशी यांनी यावेळी भावना व्यक्त केल्या.