बुलढाणा: सलग आलेल्या सुट्ट्या व अधिक मासमुळे विदर्भ पंढरी शेगाव नगरी हजारो भाविकांनी फुलल्याचे चित्र आहे. गजानन महाराजांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी भाविकांच्या सकाळपासूनच दीर्घ रांगा लागत आहे. हिंदू संस्कृतीमध्ये अधिक वा पुरुषोत्तम मासाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. या महिन्यात भाविक विविध तिर्थस्थळी आवर्जून भेट देतात. मात्र महाराजांच्या लाखो भाविकांसाठी शेगाव हेच तीर्थक्षेत्र अन प्रति वैकुंठ असल्याने अधिक महिन्यातही विदर्भासह राज्यातील हजारो भाविक शेगावी दाखल होतात. यातच सलग सुट्ट्या आल्याने भाविकांची रीघ वाढली आहे.
दर्शनासाठी ५ तास!
काल शनिवारी ( दि १२) व आज रविवारी हजारो भाविकांनी संतनगरी गजबजल्याचे दिसून आले. १५ ऑगस्टपर्यंत भाविकांची ‘अधिकची’ मांदियाळी कायम राहणार आहे. आज १३ ऑगस्टला दर्शनासाठी ५ तास लागत असल्याचे चित्र आहे. मुख दर्शनासही पाऊण ते एक तास लागत होते. संत गजानन महाराज संस्थानच्या वतीने भक्तनिवास क्रमांक पाचजवळ निशुल्क वाहनतळ व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे.
हेही वाचा – अकोला : पत्नीच्या आत्महत्येचा केला बनाव; पण सैनिक पतीचे बिंग फुटलेच
भाविकांच्या शेकडो वाहनांची पार्किंग शिस्तबद्ध रीतीने लावण्यात आलेली दिसते. श्रींच्या मंदिरात भाविकांनी पहाटेपासूनच दर्शनासाठी गर्दी केलेली दिसत होती. शिस्तबद्ध पद्धतीने व श्री संत गजानन महाराजांच्या २१ अध्याय पारायणाचे वाचन करीत गण गण गणात बोतेच्या गजरात भाविकांनी श्रद्धापूर्वक श्रींचे दर्शन घेतले. महाप्रसाद वितरण स्थळीही गर्दी दिसून आली.