महेश  बोकडे, लोकसत्ता

नागपूर : परिवहन खाते  वाहन चालवण्याचा शिकाऊ परवाना घरबसल्या देत आहे. त्यासाठीच्या ऑनलाईन परीक्षेत उमेदवारांकडून गैरमार्गाचा वापर होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन परिवहन खात्याने राष्ट्रीय माहिती केंद्राकडे (एनआयसी) ही परीक्षा कॅमेऱ्याच्या देखरेखीत करण्यासाठीची चाचपणी सुरू केली आहे.  परीक्षेदरम्यान कुणी  गैरप्रकार केला तर त्याला परीक्षेतून बाद केले जाईल.

परिवहन आयुक्त कार्यालयाने एनआयसीकडे याबाबत चाचपणी केली आहे. त्यानुसार घरून दिली जाणारी परीक्षाही ऑनलाईनच घेतली जाईल.  माहिती तंत्रज्ञानाच्या मदतीने या परीक्षेवर लक्ष ठवले जाईल. परीक्षा देताना एखादा उमेदवार कॅमेऱ्याच्या निश्चित फ्रेमच्या बाहेर गेल्यास वा संशयास्पद हालचाली करताना दिसल्यास ही प्रणाली संबंधित उमेदवाराला याचवेळी परीक्षेतून बाद करेल. त्यातून मोठ्या प्रमाणात  गैरप्रकार थांबेल, असा विश्वास परिवहन खात्याला आहे.

घरबसल्या शिकाऊ परवान्यासाठीच्या ऑनलाईन परीक्षेत गैरप्रकाराची शंका काही संस्थांकडून व्यक्त करण्यात आली आहे. त्यावर खात्याने माहिती तंत्रज्ञानाच्या मदतीने एनआयसीकडे  कॅमेऱ्याच्या देखरेखीत परीक्षा घेण्याबाबत चाचपणी सुरू केली आहे. कॅमेऱ्यात उमेदवाराच्या संशयास्पद हालचाली दिसल्याच वा तो गैरप्रकार करताना आढळल्यास त्याला स्वयंचलित परीक्षेतून बाद करण्याबाबतही चर्चा केली आहे. या पारदर्शी सुधारणेसाठी परिवहन मंत्री अॅीड. अनिल परब हेही आग्रही आहेत.

डॉ. अविनाश ढाकणे, परिवहन आयुक्त, मुंबई.