नागपूर : झाडीपट्टी रंगभूमी ही पूर्वी खास संगीत नाटकासाठी ओळखली जात होती. संगीत हा झाडीपट्टीच्या नाटकांचा आत्मा आहे. मात्र, आता झाडीपट्टी रंगभूमीचे व्यावसायीकरण झाले आहे. अश्लील नृत्ये, विनोद, गदारोळ आणि कर्णकर्कश डीजेमुळे झाडीपट्टी रंगभूमी आत्माच हरवून बसली आहे. त्यामुळे पुन्हा पूर्वीची झाडीपट्टी रंगभूमी निर्माण करणे हे झाडीपट्टीतील जुन्या कलावंतांसमोर मोठे आव्हान आहे, असे मत ज्येष्ठ नाट्य कलावंत व पद्मश्री पुरस्कार प्राप्त परशुराम खुणे यांनी व्यक्त केले. केंद्र शासनाच्यावतीने नुकताच त्यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला. या निमित्ताने त्यांनी लोकसत्ता कार्यालयाला भेट दिली.

खुणे म्हणाले, पूर्वी झाडीपट्टी रंगभूमीवर पौराणिक धार्मिक, ऐतिहासिक अशी संगीत नाटके सादर होत होती. विशेषत: नाट्य संगीत ऐकण्यासाठी लोक यायचे. मात्र, आज झाडीपट्टी रंगभूमीचे स्वरूप बदलले आहे. दिवाळीत भाऊबिजेपासून झाडीपट्टीतील नाटकांना सुरुवात होते आणि पुढे ती होळी, रंगपंचमीपर्यंत सलग चार महिने सुरू असते. दिवसा शेती करायची आणि रात्री नाटक, असा रोजचा दिनक्रम असायचा. त्यातही वेळ काढून तालमी केल्या जात होत्या. तालमी शिवाय नाटक सादर केली जात नव्हती. मात्र, आता तालमी फारशा दिसत नाही. आज झाडीपट्टी रंगभूमीचे अक्षरश: बाजारीकरण झाले असून झाडीच्या दर्जेदार नाटकांना ‘हंगामा’ या अश्लील नृत्यप्रकाराचे ग्रहण लागले आहे. कथानक हरवून बसलेल्या झाडीपट्टीतील नाटकांमध्ये नेपथ्य व शास्त्रीय संगीत संपले आहे आणि त्याची जागा ‘डीजे’ व नृत्याने घेतली आहे, असे खुणे म्हणाले.

freedom of artist marathi news
‘कलानंद’ हवा असेल तर ‘कलाकाराचं स्वातंत्र्य’ मान्य करता आलं पाहिजे…
out there screaming book
बुकबातमी: ‘भयप्रेमीं’साठीचा दस्तावेज..
Bohada look poster
५२ आठवडे, ५२ सोंग अन् त्यांचं अस्तित्व, दाक्षिणात्य निर्माते करणार मराठी चित्रपट ‘बोहाडा’ची निर्मिती
Dram Hridayangam picture and biography of village culturea
नाट्यरंग: ‘मुक्काम पोस्ट आडगाव’; ग्रामसंस्कृतीचं हृदयंगम चित्र आणि चरित्र

हेही वाचा – नागपूर : राज्यपालांविरुद्धची याचिका मागे, अधिसभेच्या बैठकीचा मार्ग मोकळा

पुण्या-मुंबईतील कलावंतांना झाडीपट्टीत आणायचे आणि त्या बळावर बक्कळ पैसा कमवायचा असाच काहीसा प्रकार गेल्या काही वर्षांपासून सुरू झाला आहे. त्यामुळे झाडीपट्टीतील नाटकांचे गणित बिघडले आहे. झाडीपट्टी रंगभूमीचे केंद्र असलेल्या वडसा गावात ५० हून अधिक कंपन्या असून त्यांच्या माध्यमातून नाटक ठरविली जातात. मात्र, त्यातील काही कंपन्यांकडून सुमार नाटक सादर केले जातात. झाडीपट्टीतील नाटकांचा व्यवसाय हा शंभर कोटींच्या वर आहे. येथे स्थनिक कलावंतांनाही एका नाटकामागे तीन ते चार हजार रुपये मिळतात. मात्र, पुण्या-मुंबईतील कलावंतांना अधिकचे पैसे मिळतात. झाडीपट्टीत कलावंत घडणे ही प्रक्रिया पूर्णपणे थांबली आहे. झाडीपट्टी रंगभूमीवर व्यावसायिक म्हणून पहिले नाटक दिवा जळू दे सारी रात केले होते. सर्वांच्या आशीवार्दामुळे आणि झाडीपट्टीतील रसिकांच्या प्रेमामुळे आजही नाटकाच्या माध्यमातून तो दिवा जळतो आहे, असेही खुणे यांनी सांगितले.

कष्टाचे आज चीज झाले

पद्मश्री पुरस्काराची घोषणा झाली त्यावेळी गेल्या ५० वर्षांपासून झाडीपट्टी रंगभूमीवर काम केल्याचा हा पुरस्कार असल्याची भावना मनात निर्माण झाली. आयुष्यात एवढा मोठा पुरस्कार मिळेल, असे कधीही वाटले नाही. आयुष्यभर खूप कष्ट भोगले, मात्र त्या कष्टाचे आज चीज झाले आहे. हा पुरस्कार मला मिळाला असली तरी तो झाडीपट्टी रंगभूमीचा सन्मान आहे, त्यामुळे आम्हा कलावंतांची जबाबदारी वाढली आहे.

हेही वाचा – भाजपचा गड सर करणारे अडबाले यांची दीड वर्षांपासूनच तयारी

दादा कोंडकेंनी मुंबईला बोलावले, पण…

झाडीपट्टीतील दादा कोंडके म्हणून माझी ओळख निर्माण झाली. त्यामुळे, दादांना भेटण्याची इच्छा होती. एका निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ दादा कोंडके कुरखेड्याला आले होते. त्यावेळी माझ्या एका मित्राने दादांशी भेट करून दिली. त्यावेळी दादांनी मला मुंबईला येण्याचे निमंत्रण दिले होते, पण त्यावेळी जाण्यासारखी परिस्थिती नव्हती, असेही खुणे यांनी सांगितले.