बुलढाणा: मेहकर तालुक्यातील हिवरा आश्रमनजीकच्या कोराडी प्रकल्पात एका युवकाला जलसमाधी मिळाली तर बोटचालकाची सतर्कता व धाडस यामुळे एका युवकाचे प्राण वाचले. या युवकाचा मृतदेह आज संध्याकाळी उशिरापर्यंत सापडला नसून शोधमोहीम सुरूच आहे. ही घटना आज २२ जून रोजी घडली.
प्राप्त प्राथमिक माहितीनुसार, आदेश किशोर इंगळे, ऋतीक भारत सोनुने, लक्ष्मण गजानन इंगळे, अनिकेत गणेश सुरडकर, रोशन मुरारी इंगळे हे विद्यार्थी विवेकानंद आश्रमानजीकच्या कोराडी प्रकल्पात बोटीने जलविहार करीत होते. दरम्यान, यातील आदेश किशोर इंगळे, रोशन मुरारी इंगळे (सर्व राहणार भानखेड ता. चिखली, जिल्हा बुलढाणा) ह्या दोघांनी बोटीतून उड्या घेतल्या. कोराडी प्रकल्पात तुडूंब पाणी असतानाही बोट चालक गुलाब कांबळे यांनी धाडस दाखवून आदेशला बाहेर काढले. मात्र रोशन बुडाला. दरम्यान, ठाणेदार नंदकिशोर काळे यांनी घटनास्थळी दाखल होत पोलीस आणि मासेमारी करणाऱ्यांच्या सहाय्याने शोधमोहीम सुरू केली.