नागपूर : कळत न कळत चुका किंवा गुन्हा घडल्यानंतर कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांमध्ये सकारात्मकता निर्माण व्हावी, यासाठी कारागृह प्रशासन प्रयत्न करीत असते. या विभागाने कैद्यांना कुटुंबीयांशी भ्रमणध्वनीवर संवाद साधण्याची मुभा दिली आहे. या उपक्रमात गेल्या तीन महिन्यांत नागपूर कारागृहातील साडेचार हजार कैद्यांनी लाभ घेतला.

कारागृह विभागाच्यावतीने ‘ई-प्रिझन्स’ प्रणालीअंतर्गत भारतीय तसेच विदेशी कैद्यांना कुटुंबीयांशी संवाद साधण्यासाठी ‘ई-मुलाखत’ सुविधा सुरू करण्यात आली आहे. राज्यभरातील कारागृहातून तब्बल २१ हजार ९६३ पुरुष व महिला कैद्यांनी या सुविधेचा लाभ घेतला. राज्यात जानेवारी ते मार्च या कालावधीमध्ये तळोजा मध्यवर्ती कारागृहातील ३ हजार ४७८, ठाणे मध्यवर्ती कारागृह ३ हजार ४३८, नागपूर मध्यवर्ती कारागृह ४ हजार ६५४, मुंबई मध्यवर्ती कारागृह १ हजार ७९७, नाशिक मध्यवर्ती कारागृह १ हजार ५५९, कल्याण जिल्हा कारागृह १ हजार ४४२, येरवडा मध्यवर्ती कारागृह १ हजार २२८ पुरुष व महिला कैद्यांनी या उपक्रमात सहभाग घेऊन कुटुंबीयांशी संवाद साधला.

आणखी वाचा-नागपूर लोकसभा : मतदान करणाऱ्यांच्या संख्येत अल्प वाढ, संकेत काय?

कारागृहात शिक्षा भोगत असताना अनेक कैद्यांमध्ये नकारात्मक भावना निर्माण होतात. कुटुंबीय आणि समाजापासून अलिप्त कारागृहात राहणारे कैदी नैराश्यात जातात. अनेक कैद्यांना कुटुंबीयांशी जवळीकता नसल्यामुळे दुरावा निर्माण होतो. अशा कैद्यांमध्ये सुधारणा व्हावी आणि सकारात्मकता निर्माण व्हावी, यासाठी कारागृह प्रशासनाने कुटुंबीय, नातेवाईक, वकील यांना बंद्यांसोबत मुलाखत घेण्याकरिता ‘ई-प्रिझन्स’ प्रणालीवर पूर्वनोंदणी करण्याची सुविधा दिली. या सुविधेमुळे नातेवाईकांना इच्छित दिवशी व वेळी मुलाखत घेता येते.

गंभीर गुन्ह्यातील आरोपींना लाभ नाही

दहशतवादी कारवायामधील तसेच पाकिस्तानी कैद्यांना सुरक्षेच्या कारणास्तव या सुविधेचा लाभ नाकारण्यात आला आहे. सुरक्षेच्या कारणावरून हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील कारागृहांमध्ये सुमारे ६०० पेक्षा अधिक विदेशी कैदी असून या सुविधेमुळे विदेशी कैद्यांना त्यांच्या विदेशातील कुटुंबीयांशी संवाद साधता येत आहे.

“आर्थिक अडचणींमुळे नागपुरात येऊन कारागृहातील आप्तेष्टांची भेट न घेऊ शकणाऱ्या कुटुंबीयांना सुविधा झाली आहे. शालेय शिक्षण घेणारी मुले आणि वृद्ध आईवडिलांना थेट भ्रमणध्वनीवर व्हिडीओ कॉल करून बोलता येते. तसेच कुटुंबीयांशी संवाद साधणाऱ्या कैद्यांमध्ये सकारात्मक बदल दिसत आहेत.” -वैभव आगे, कारागृह अधीक्षक, मध्यवर्ती कारागृह, नागपूर.