वाशीम : तालुक्यातील बाबुळगाव ते मसला हा पाच किमी अंतराचा रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून ३ कोटी ३५ लाख रुपये खर्च करून बांधण्यात आला. परंतु हा रस्ता बांधताना या रस्त्याच्या मधोमध असलेले विद्युत खांब काढणे गरजेचे असताना ते तसेच असल्यामुळे विद्युत खांबामुळे अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे. हा रस्ता बांधताना संबंधित विभागाचे अधिकारी किती दक्ष राहून काम करून घेतात हे यावरून लक्षात येते.

करोडो रुपये खर्च करून ग्रामीण भागात रस्त्याचे बांधकाम करण्यात येते. मात्र, रस्ते बांधल्यानंतर वर्षभरातच त्याची चाळण होते. अशी स्थिती जिल्ह्यातील अनेक रस्त्यांची आहे. जिल्ह्यातील रस्त्यांच्या गुणवत्तेचा प्रश्न असून काही रस्ते बनवताना चुकासुद्धा होत आहेत. असाच प्रकार तालुक्यातील बाभुळगाव – मसला रस्त्यावरून दिसून येते. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून १४ ऑगस्ट २०१९ मध्ये बाबुळगाव ते मसला रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आणि हा रस्ता २०२३ मध्ये पूर्ण करण्यात आला आहे. रस्ता बनवण्याच्या आधी रस्त्याच्या मधोमध असलेले विद्युत खांब हटविणे गरजेचे असताना तसे न करता रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण करण्यात आले आहे. मात्र रस्त्यावरील विद्युत खांब तसेच आहेत. यामुळे विद्युत खांबाला वाहने धडकून अपघात होऊन जीवितहानी होण्याचा धोका व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा – वर्धा: यापूर्वीही विधानसभेत दारूबंदी चर्चेत, पण गांधीवादीनी घेतला असा पवित्रा…

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेकडे जबाबदार अधिकारी असून कार्यकारी अभियंता, उप अभियंता आहेत. या संदर्भात त्यांनी विद्युत वितरण विभागाकडे पाठपुरावा करून रस्ता होण्याआधीच विद्युत खांब हटविण्याची गरज असताना, आता किमान रस्ता पूर्ण झाल्यानंतर तरी विद्युत खांब काढतील का? असा प्रश्न केला जात आहे.

हेही वाचा – भंडारा: सोन्याचे दागिने चमकविण्याच्या बहाण्याने घरी आले आणि….

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रस्त्यावरील विद्युत खांब हटविण्यासाठी विद्युत वितरण विभागाकडे प्रस्ताव पाठवलेला आहे. त्या संदर्भात पाठपुरावादेखील सुरू आहे. मात्र, रस्त्याचे काम थांबू नये म्हणून डांबरीकरण पूर्ण करण्यात आले आहे. अजून रस्त्याची कामे बाकी आहे. त्यामुळे लवकरात लवकर रस्त्यावरील विद्युत खांब काढण्यात येतील, असे मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, कनिष्ठ अभियंता सत्यम मोकळे म्हणाले.