पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘कौशल्य भारत’ अशी हाळी एक वर्षांपूर्वी दिली मात्र, कौशल्य भारत उभे करण्याचे व्रत शासकीय औद्योगिक संस्थेने १९६२ पासून स्वीकारले असून आज इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक आणि बी.एस्सी. झालेले विद्यार्थीही ‘आयटीआय’कडे वळत आहेत. परिसर मुलाखतीद्वारे शेकडोच्या संख्येने ‘आयटीआय’ झालेले उमेदवार कंपन्यांद्वारे निवडले जातात. आजच ‘आयटीआय’मध्ये हिंदाल्को प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने परिसर मुलाखत घेतली, तर २१ व २२ जूनला मारुती-सुझुकीला तब्बल ६०० उमेदवारांची गरज होती. बऱ्याच विद्यार्थ्यांना सुरुवातीलाच १८ हजारच्यावर पॅकेज मिळाले.
देशभरात एकाच कायद्याने चालणारे, एकच अभ्यासक्रम असलेले, एकच परीक्षा असलेली आणि निकालही एकाच दिवशी जाहीर होणारा हा एकमेव अभ्यासक्रम आहे. बाकी दहावी-बारावीचा, पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमही देशभरात वेगवेगळे आहेत आणि त्यांच्या निकालावरून सावळा गोंधळ दरवर्षीच होत असतो. ‘आयटीआय’ हे नॅशनल काऊन्सिल ऑफ व्होकेशनल ट्रेनिंग (एनसीव्हीटी) अंतर्गत येत असून ही केंद्र सरकारची योजना आहे. ‘आयटीआय’चे प्रमाणपत्र केंद्र शासन देते.
आजच्या घडीला महाराष्ट्रात सर्वात जास्त मागणी असलेला हा एकमेव अभ्यासक्रम आहे. पदवी अभियांत्रिकीच्या २४ हजारच्या वर जागा असून अर्ज १९ हजारच्या आसपास आले आहेत. अर्थात सर्वच विद्यार्थी त्याठिकाणी प्रवेश घेणार नाहीत. तसेच गेल्यावर्षीपर्यंत पॉलिटेक्निकच्या जागांवर विद्यार्थ्यांच्या उडय़ा पडत असत मात्र, यावर्षी २५ हजार जागा असूनही अर्ज केवळ ११ हजार आले आहेत. यातील किती विद्यार्थी प्रवेश घेतील, ही शंकाच आहे. तीच गोष्ट अकरावी प्रवेशाची आहे. मात्र ‘आयटीआय’ची गोष्टच वेगळी! नागपूर ‘आयटीआय’च्या १,०६३ जागा आहेत आणि ५ हजार अर्ज आलेले आहेत. अर्जकर्त्यांची संख्या पाच पटीने जास्त आहे.
कोणताही अभ्यासक्रम नोकरीच्या दृष्टीने किती फायदेशीर आहे, याचे आडाखे विद्यार्थी व पालक बांधत असतो. पूर्वी काही नाही तर कर ‘आयटीआय’ असे म्हटले जायचे मात्र, आता सर्व करून ‘आयटीआय’ करणारे विद्यार्थी हमखास नोकरी मिळवत आहेत.
‘आयटीआय’चा नवीन प्रयोग
एक किंवा दोन वर्षांचे अभ्यासक्रम (ट्रेड) करणाऱ्या विद्यार्थ्यांना आंतरवासिता करणे आवश्यक असते. ‘आयटीआय’ने आंतरवासिता करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन नोंदणी गेल्यावर्षीपासून सुरू केली आहे. तसेच विद्यार्थ्यांना कंपन्यांची माहितीही संकेतस्थळावरच उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे ते ज्या ट्रेडचे असतात, तो ट्रेड असलेल्या कंपन्यांमध्ये आंतरवासिता किंवा नोकरीसाठी बायोडाटा पाठवतात. संकेतस्थळावरच अर्ज भरून देतात. विद्यार्थी व कंपन्यांशी थेट संवाद या संकेतस्थळावरूनच होतो. कंपन्या परस्पर विद्यार्थ्यांची पत्र आणि लघुसंदेश पाठवून निवड करतात. उमेदवारांच्या आंतरवासितेचा अहवाल नंतर ‘आयटीआय’ला पाठवला जातो. ४५० ते ५०० संकेतस्थळे दाखवण्यात आली असून त्यांना ७५०० ते ८५०० पर्यंत विद्यावेतन मिळते, असे नागपूर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील वरिष्ठ अंतरवासिता सल्लागार अनिल सोनकुसरे यांनी सांगितले.
आयटीआयमध्ये अनेक अभ्यासक्रम आहेत. त्यात प्रत्येकाची मागणी नसते. सर्वात मोठी यादी फिटर आणि इलेक्ट्रिशियन्सच्या विद्यार्थ्यांची असते. फिटरला मागणी जास्त असते. कारण कंपन्यांमध्ये फिटर जास्त संख्येने लागतात, तर इलेक्ट्रिशियन दोन-चार हवे असतात. मशिनिस्ट, टर्नर, फिटर, मोटार मेकॅनिक, डिझेल मेकॅनिक, ट्रॅक्टर मेकॅनिक इत्यादीही अभ्यासक्रम असतात. काही ट्रेडला चांगली मागणी असतानाही पालक किंवा विद्यार्थी पारंपरिक मानसिकतेमुळे तिकडे दुर्लक्ष करतात. कारपेंटर किंवा पेंटर, गवंडी आणि इतर कामातही चांगला रोजगार मिळतो मात्र, अज्ञानामुळे फार कमी मुले तिकडे वळतात.
जगाच्या पाठीवर आयटीआयचे प्रमाणपत्र कुठेही चालते. कुशल कारागिरांची निर्मिती याठिकाणी होते. त्यामुळे कंपन्यांकडून चांगली मागणी असते. म्हणूनच हल्ली इंजिनिअरिंग, पॉली आणि इतर पदवी अभ्यासक्रम झालेले १५ ते २० टक्के विद्यार्थी नोकरी मिळवण्यासाठी ‘आयटीआय’ला प्रवेश घेतात. काहींना तो अभ्यासक्रम झेपत नाही. त्यामुळेच ‘आयटीआय’चा मेरीट टक्का दरवर्षी वाढत आहे. ७५ ते ८० टक्क्यांपर्यंत मेरीट जाते. कुशल कारागिर निर्माण करणारी ही केंद्र शासनाची योजना असून ती नॅशनल काऊन्सिल ऑफ व्होकेशनल ट्रेनिंग (एनसीव्हीटी) अंतर्गत असून १९६१-६२ च्या कायद्यांतर्गत ‘आयटीआय’वर काम चालते. देशभरात एकच कायदा, एकच पेपर, एकच परीक्षा आणि एकाचवेळी निकाल जाहीर होणारा हा एकमेव अभ्यासक्रम असल्याचे सोनकुसरे म्हणाले.