हैदराबादला लग्नासाठी गेलेल्या कुटुंबातील १२ जण करोनाग्रस्त!

शंकरनगरच्या मुलाचे लग्न हैद्राबादला झाल्यावर वरात नागपुरात परतली.

Coronavirus-1

शंकरनगरचे नवदाम्पत्य गृहविलगीकरणात

नागपूर : शंकरनगरच्या मुलाचे लग्न हैद्राबादला झाल्यावर वरात नागपुरात परतली. काहींना विविध लक्षणे सुरू झाल्यावर वरातीत गेलेल्यांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यात नवदाम्पत्यासह इतर काहींना सोडून १२ जणांना करोना असल्याचे निदान झाल्याने शंकरनगरात खळबळ उडाली. पैकी काहींना रुग्णालयात दाखल केले गेले. तर आरोग्य विभागाने नवदाम्पत्याला विलगीकरणात राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या माहितीनुसार शंकरनगर परिसरातील एका मुलाचे लग्न हैद्राबादच्या मुलीशी निश्चित झाले. ठरलेल्या मुहूर्तावर काही दिवसांपूर्वी शंकरनगरच्या कुटुंबातील सर्व सदस्यांसह त्यांच्या जवळचे असे एकूण २० सदस्य लग्नासाठी हैद्राबादला गेले. तेथे लग्नात सगळय़ांनी खूप धमाल केली. कार्यक्रम आटोपल्यावर सगळे नागपुरात परतले. त्यानंतर लग्न झालेल्या घरातील काहींना विविध लक्षणे सुरू झाली. डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांची चाचणी केली असता काहींचा करोना अहवाल सकारात्मक आला. महापालिकेच्या आरोग्य विभागाने तातडीने संपर्कातील वरातीत सोबत गेलेल्यांसह इतरांचे नमुने घेत चाचणीसाठी पाठवले. त्यात या कुटुंबासह जवळचे नातेवाईक असे १२ जणांना करोना असल्याचे निदान झाले. परंतु नवदाम्पत्याचा अहवाल मात्र नकारात्मक आला. करोनाचे निदान झालेल्यांपैकी कुणालाही तीव्र लक्षणे नसले तरी काही जोखमेच्या गटात असल्याने तातडीने उपचारासाठी व्होकार्ट आणि नेल्सन या खासगी रुग्णालयात दाखल झाले. तर महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून मात्र नव दाम्पत्याला काही दिवस गृह विलगीकरणात राहण्याचा सल्ला दिला गेला आहे. पाच दिवसानंतर पुन्हा या नवदाम्पत्यांसह नकारात्मक अहवाल आलेल्यांच्या चाचण्या पुन्हा करण्यात येणार आहे.

२४ तासांत १९ रुग्णांची भर

 नागपूरच्या शहरी भागात दिवसभरात १६, ग्रामीणला २, जिल्ह्याबाहेरील १ असे एकूण १९ नवीन करोनाग्रस्त आढळले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या करोनाग्रस्तांची संख्या ३ लाख ४० हजार ५३७, ग्रामीण १ लाख ४६ हजार २३७, जिल्ह्याबाहेरील ६,९१० अशी एकूण ४ लाख ९३ हजार ६८४ रुग्णांवर पोहचली. तर दिवसभऱ्यात शहरात १, ग्रामीणला १ असे दोघे करोनामुक्त झाले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या करोनामुक्तांची संख्या ३ लाख ३४ हजार ५८३, ग्रामीण १ लाख ४३ हजार ६१७, जिल्ह्याबाहेरील ५,२८१ अशी एकूण ४ लाख ८३ हजार ४८१ व्यक्तींवर पोहचली. दिवसभऱ्यात जिल्ह्यात एकही मृत्यू नसून २,९४१ संशयितांच्या चाचण्या करण्यात आल्या. अनेक दिवसानंतर जिल्ह्यात तब्बल १९ नवीन करोनाग्रस्त रुग्ण आढळले, हे विशेष.

माय-लेकीचे नमुने पुण्याला पाठवले 

 इंग्लंडहून भारतातील प्रथम मुंबई व त्यानंतर नागपुरात माहेरी आलेल्या एका महिला व तिच्या मुलीला करोना असल्याचे निदान झाले होते. या दोघांना एम्समध्ये दाखल करण्यात आले असून त्यांचे नमुने जनुकीय तपासणीसाठी पुणेच्या राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेत पाठवण्यात आल्याची माहिती महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय चिलकर यांनी दिली. अहवालानंतरच दोघांमध्ये करोनाचे ओमायक्रॉन अथवा कोणते रूप आहे, हे स्पष्ट होईल.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नागपूर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Family members marriage coronation ysh