भंडारा : भंडारा जिल्हा कारागृहातील एका बंदीने कर्तव्यावरील महिला रक्षकावर प्राणघातक हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या बंदीवानाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना शिविगाळ करुन त्यानाही जीवानिशी मारण्याची धमकी दिली आहे. या प्रकारामुळे कारागृह प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. शाम उर्फ पिटी चाचेरे, वय ३५ असे या हल्लेखोर बंदीवानाचे नाव आहे.

जिल्हा कारागृह वर्ग १ येथे महिला रक्षक ही न्यायाधीन बंदीवानांना व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे मुलाखती घेत असताना न्यायाधीन बंदी शाम उर्फ पिटी चाचेरे याची मुलाखतीची वेळ संपत आली होती. त्यामुळे महिला रक्षकाने त्याला पाच मिनीट शिल्लक राहिले असे बोलले असता आरोपीने कर्तव्यावरील महिला रक्षकासोबत वाद घातला. त्यानंतर त्याची मुलाखतीची वेळ पूर्ण झाल्याने महिला रक्षकाने व्हिडीओ कॉल बंद केला. त्यावर आरोपी बंदीने राग व्यक्त करत कर्तव्यावरील महिला रक्षकाच्या अंगावर धावून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सोबतच त्यांना शिविगाळ करुन हाताला झटका देऊन शासकीय कामात अडथडा निर्माण केला.

हेही वाचा…आजी-माजी आमदारांचा इंटक नेत्यांवरील अब्रुनुकसानीचा दावा…नेमकं प्रकरण काय?

तेव्हा महिला रक्षकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना गैरवर्तन केल्याची माहिती दिली. भंडारा पोलीसात गुन्हा दाखल माहिती मिळताच वरिष्ठ अधिकारी हे मुलाखती कक्षात आले असता आरोपी बंदीवानाने वरिष्ठ अधिकारी संतोष क्षीरसागर आणि गुलाब खरडे यांना तुम्ही मला बोलू देत नाहीत, असे बोलून अश्लील शिविगाळ केली. तसेच गुलाब खरडे यांना टिप्परद्वारे जीवाने ठार मारण्याची देखील धमकी दिली. पोलिसांनी दाखल तक्रारीवरुन आरोपी बंदीवाना विरुद्ध भंडारा पोलीसात गुन्हा दाखल केला आहे. सध्या या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत पवार करीत आहे. जिल्हा कारागृहात या आधीही अशी घटना घडली आहे. काही महिन्यांपूर्वी एका बंदिवानाने आत्महत्या करण्यासाठी झाडावर चढून कारागृह प्रशासनाला वेठीस धरले होते.