विजय वडेट्टीवार यांचा आरोप

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या (मनरेगा) कामात गडचिरोली जिल्ह्य़ात कोटय़वधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. कुशल आणि अकुशल कामावर ज्या प्रमाणात खर्च होणे आवश्यक होते, त्या प्रमाणात खर्च झालेला नाही. अकुशल लोकांच्या रोजगारावर अधिक खर्च न करता तो साहित्य खरेदीत अधिक करण्यात आला आणि बनावट देयके सादर करून लाखो रुपयांची हेराफेरी झाली, असा आरोप विधानसभेतील उपनेते आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत केला.

वडेट्टीवार म्हणाले, केंद्र सरकारच्या कायद्यानुसार मनरेगामध्ये कुशल कामासाठी ४९ टक्के आणि अकुशल कामासाठी ५१ टक्के निधी खर्च करणे बंधनकारक आहे. मात्र, गडचिरोली जिल्ह्य़ात ६२ टक्के कुशल कामासाठी आणि ३८ टक्के रक्कम अकुशल कामासाठी वापरण्यात आली. अशा प्रकारे निधी वळणे गुन्हा आहे.  या जिल्ह्य़ासाठी या योजनेत १३९ कोटी रुपये मंजूर झाले. यातील ३७ कोटी रुपयांची साहित्य विना ई-निविदा काढता खरेदी करण्यात आली. सिमेंट खरेदीसाठी तर ११.५४ कोटी रुपये खर्च करण्यात आले आणि या सर्व साहित्य खरेदीची देयके एका कृषी केंद्राची जोडण्यात आली. कुरखेडा आणि मरकडा, घोट येथील कामात झालेल्या घोटाळ्याची उदाहरणे देताना ते म्हणाले, कुरखेडा येथे गेल्या आर्थिक वर्षांत कुशल कामाकरिता २ कोटी ३२ लाख रुपये खर्च करण्यात आले. मजुरांवर (अकुशल) १ कोटी ११ लाख रुपये खर्च झाले. या योजनेचा मूळ उद्देश्य ग्रामीण भागातील लोकांना रोजगार देणे आहे, परंतु कामगारांवर अधिकाधिक खर्च न करता साहित्य खरेदीत अधिक खर्च केला जात आहे. निधी खर्च करण्याचे निकष पाळण्यात येत आहे की नाही, हे बघण्याची जबाबदारी राज्य आर्थिक सल्लागार समितीची आहे. राज्य सरकारने राम बोंडे यांना या समितीवर नियुक्त केले आहे. ते भाजपशी संबंधित आहेत. तेच या आर्थिक अनियमिततेला प्रोत्साहन देत आहेत. शिवाय त्यांना मनरेगाचा ऑडिट करण्याचा पाच वर्षांचा अनुभव आहे. बोंडे यांची नियुक्ती ताबडतोब रद्द करण्यात यावी आणि याप्रकरणी चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही वडेट्टीवार यांनी केली.

भाजपच्या खात्यात मल्याचे किती कोटी?

कर बुडवून देशाबाहेर पडलेला विजय मल्या काँग्रेसच्या सांगण्यावरून केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांच्यावर आरोप करत असल्याचे विधान राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. ते तथ्यहीन आहे. देशात दिल्लीपासून गल्लीपर्यंत भाजपची सत्ता आहे. सर्व सुरक्षा, तपास यंत्रणा त्यांच्या हाती आहेत. अशा स्थितीत कायद्याच्या कचाटय़ात सापडलेली व्यक्ती सरकारविरोधात बोलू शकेल, असे वाटत नाही. त्यामुळे सरकार आणि भाजपवर होणाऱ्या आरोपाबाबत उठसूठ काँग्रेसला जबाबदार धरण्यापेक्षा तपास यंत्रणांना कामाला लावून अरुण जेटली आणि विजय मल्याच्या भेटीचा खुलासा करावा. सोबतच विजय मल्याने देशाबाहेर जाण्यापूर्वी भाजपच्या बँक खात्यात पक्षनिधी म्हणून किती कोटी रुपये टाकले, याचाही खुलासा सरकारने करावा, असे आव्हान वडेट्टीवार यांनी दिले.