यवतमाळ : रूग्णांची सतत वर्दळ असलेल्या येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील स्त्री रोग विभागाच्या शस्त्रक्रिया गृहात भीषण आग लागली. आज गुरूवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडलेल्या या घटनेत शस्त्रक्रिया गृहाचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. शस्त्रक्रिया गृहातील एका वातानुकूलित यंत्राला आग लागल्याने ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात येते.

वैद्यकीय महाविद्यालय परिसरातील फेज थ्रीमधील इमारतीत स्त्री रोग विभागात प्रसुती गृह, बालरूग्ण विभाग आदी कक्ष आहेत. या इमारतीत मध्यवर्ती ठिकाणी शस्त्रक्रिया गृह आहे. येथे प्रसुतीसाठी आलेल्या महिलांचे सिझेरियन ऑपरेशन केले जातात. आज सकाळी बंद शस्त्रक्रिया गृहातून प्रचंड धूर बाहेर पडू लागला. धुरामुळे परिसरात काहीही दिसेनासे झाले. तेव्हा शस्त्रक्रिया गृहास आग लागल्याचे लक्षात आले. कर्मचाऱ्यांनी लगेचच खिडक्यांची तावदाने फोडली व अग्नीरोधक फवारा मारला.

हेही वाचा…“विजय वडेट्टीवार यांना मंत्रिपदाच्या काळातही भाजपात येण्याची घाई झाली होती…” धर्मरावबाबा आत्राम यांचा गौप्यस्फोट; म्हणाले, “त्या बैठकीत मी…”

आग आटोक्यात येत नसल्याने घटनेची माहिती अग्नीशमन विभाग व पोलिसांना देण्यात आली. सर्व यंत्रणा तत्काळ घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. नवीनच इमारत असल्याने येथे ठिकठिकाणी पाईपलाईन टाकून पाण्याचे फवारे लावण्यात आले आहे. आज आग लागताच ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. मात्र या पाईपलाईनला अनेक ठिकाणी गळती लागल्याने ही यंत्रणा आग विझविण्याच्या कामी येण्याऐवजी अनेक वॉर्डात फवाऱ्यांमुळे रूग्ण व नातेवाईक भिजले. वॉर्डात पाणी साचले.

त्यामुळे आग विझवण्यासोबतच वॉर्डातील पाणी काढण्याचे काम यंत्रणेला करावे लागत आहे. या इमारतीतील संकटकालीन मार्ग असलेले गेट कायमस्वरूपी कुलूपबंद राहत असल्याची तक्रार यावेळी उपस्थितांनी केली. आजच्या आगीने भीषण रूप धारण केले असते तर बाहेर पडायला जवळचा मार्गच नसल्याने मोठे संकट ओढवले असते. मात्र सुदैवाने हानी झाली नाही. बुधवारी रात्री या शस्त्रक्रिया गृहात काही शस्त्रक्रिया पार पडल्या होत्या. त्यावेळी वातानुकूलित यंत्रणा सुरू राहिल्याने किंवा शॉटसर्किट होवून आग लागल्याची शक्यता व्यक्त होत आहे. महाविद्यालयात ठिकठिकाणी वातानुकूलित यंत्रणा आहे. आजच्या घटनेमुळे या संपूर्ण यंत्रणेसह इमारतीचे ‘फायर ऑडिट’ करण्याची मागणी पुढे आली आहे.

हेही वाचा…राजू शेट्टींचे एक पाऊल मागे! बुलढाण्यात रविकांत तुपकर यांना पाठिंबा

वरिष्ठांना पाठवला अहवाल

या संदर्भात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. रवींद्र राठोड यांच्याशी संपर्क केला असता, या आगीत शस्त्रक्रिया गृहाचे मोठे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले. काही काळाकरीता हे सिझेरीयन शस्त्रक्रियागृह इतरत्र हलविण्यात येत असल्याचे ते म्हणाले. आगीत जीवितहानी झाली नाही. या घटनेचा अहवाल वरिष्ठांना पाठविण्यात आल्याचे डॉ. राठोड यांनी सांगितले.