मे महिन्यात अंतिम करार
नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी फ्रान्स बँकेनेही आर्थिक पाठबळ देऊ केले आहे. या कंपनीचे शिष्टमंडळ सध्या नागपूर दौऱ्यावर असून त्यांनी या प्रकल्पाची माहिती घेतली व त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत नागपूर मेट्रो रेल्वे कार्पोरेशन कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक बिजेश दीक्षित यांनी सांगितले की, पुढील वर्षी मे महिन्यापर्यंत कर्जासंबंधी करार केला जाईल, फ्रान्स या प्रकल्पासाठी ९०० कोटींचे कर्ज देणार आहे. यावेळी फ्रान्स शिष्टमंडळातील महिला प्रतिनिधी प्रिसाईल डी. कोनिक उपस्थित होत्या.
केंद्र व राज्य सरकारसह नागपूर मेट्रो रेल्वेला जर्मन बँकेनेही कर्ज देऊ केले आहे. फ्रान्सनेही होकार दिल्याने पुढच्या काळात या प्रकल्पाला गती मिळण्याची शक्यता आहे. फ्रान्सचे तीन सदस्यीय शिष्टमंडळ प्रकल्पाची माहिती घेण्यासाठी सध्या नागपूर दौऱ्यावर आहे. त्यांनी शहरातील काही प्रकल्पस्थळाला भेट दिली व माहिती घेतली. त्यांनतर मेट्रो रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. अर्थसहाय्याच्या मुद्यावरही यावेळी चर्चा झाली. प्रकल्पाच्या कामावर समाधान व्यक्त करताना प्रिसाईल कोनिक यांनी मार्च २०१६ पर्यंत कर्जाबाबत अंतिम निर्णय होईल व मे २०१६ पर्यंत याबाबत करार केला जाईल. त्यानंतर टप्प्याटप्प्याने निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे सांगितले. व्याजदर कमी राहील असे त्यांनी स्पष्ट केले. शिष्टमंडळाने बंगलोर आणि कोची येथील मेट्रो रेल्वे प्रकल्पाचीही पाहणी केली. नागपूरचा प्रकल्प यापेक्षा वेगळा असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, मेट्रो प्रकल्पाला लागणारी ७७ टक्के जमीन कंपनीला प्राप्त झाली आहे. उर्वरित जमीनही लवकरच मिळणार असून त्यासंदर्भात प्रक्रिया सुरू आहे. ३.५ हेक्टर खासगी जमीन लागणार आहे. त्याबाबतही वाटाघाटी सुरू आहे. अजनी रेल्वेजवळील मेट्रोचे स्थानक हलवण्याबाबत न्यायालयाने विचारणा केली असली तरी त्यावर समाधानकारक तोडगा काढण्याचे प्रयत्न केले जाईल. स्थानकाच्या जागा यापूर्वीच निश्चित करण्यात आल्या असून आता त्यात बदल केल्यास एकूण प्रकल्पास दोन वर्ष विलंब होईल, असे दीक्षित यांनी सांगितले.
वर्धा मार्गावरील काम लवकरच
वर्धा मार्गावरील मेट्रो रेल्वेच्या कामाला पंधरा दिवसात सुरुवात होणार असून त्यासाठी वाहतूक वळवण्यात येणार आहे. नागरिकांची कमीत कमी गैरसोय होईल हे लक्षात घेऊन वाहतूक आराखडा तयार करण्यात आला असून तो वाहतूक शाखेकडे पाठवण्यात आला आहे. वाहतूक व्यवस्थापनासाठी कंपनीने स्वतंत्र कक्ष सुरूकेला असून त्याची जबाबदारी वाहतूक शाखेतून सेवानिवृत्त झालेले अधिकारी गिरी यांच्याकडे देण्यात आली आहे. खापरीपासून रहाटे कॉलनीपर्यंतच्या वाहतुकीचा अभ्यास करूनच हा आराखडा तयार करण्यात आला आहे. वाहतूक वळवताना त्याची माहिती नागरिकांना देण्यासाठी आवश्यक सूचना फलक लावण्यात येणार आहे, असे कंपनीचे प्रसिद्धी प्रमुख आपटे यांनी सांगितले.

फ्रान्स शिष्टमंडळातीलप्रतिनिधी शहरातील मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या कामाची माहिती घेताना.