गडचिरोली : उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी केवळ एक दिवसाचा अवधी शिल्लक असून भाजपमध्ये गडचिरोली नगरपालिकेसाठी नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीवर अद्याप एकमत झालेले नाही. उमेदवार निवडीवरून पक्षांतर्गत गटबाजीमुळे अंतिम निर्णय वरिष्ठ पातळीवर होणार असल्याने स्थानिक नेत्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. त्यामुळे उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
जिल्ह्यातील देसाईगंज, आरमोरी आणि गडचिरोली येथे नगरपालिकेची निवडणूक पार पडणार आहे. यातील गडचिरोली नगरपलिका राजकीयदृष्ट्या महत्त्वाची समजली जाते. येथे सर्वच प्रमुख पक्षांनी वर्चस्व स्थापन करण्यासाठी संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. काँग्रेस आणि भाजप स्वबळावर लढणार हे जवळपास निश्चित आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिंदेसेना शहर विकास आघाडीच्या नावाखाली एकत्र आले आहे. इतर मित्रपक्षांनीदेखील वेगळी चूल मांडली आहे. त्यामुळे गडचिरोली पालिकेच्या निवडणुकीत अधिक चुरस निर्माण झाल्याचे चित्र आहे.
नगराध्यक्षपदासाठी सर्वसाधारण महिला असे आरक्षण निघाल्याने सर्वच पक्षात इच्छुकांची संख्या अधिक आहे. यापैकी काँग्रेस आणि शहर विकास आघाडीचे उमेदवार जवळपास निश्चित झाले आहे. मात्र, सत्ताधारी भाजपमध्ये नगराध्यक्ष पदावरून सुरू असलेल्या अंतर्गत गटबाजीमुळे प्रचंड अस्वस्थता आहे. आपल्याच गटाच्या व्यक्तीला उमेदवारी मिळावी यासाठी भाजप नेत्यांची मुंबईवारी नामांकन दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत सुरू असल्याने उमेदवारी कुणाला मिळणार याबद्दल उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आजच्या घडीला नगराध्यक्षपदासाठी भाजपमध्ये तीन प्रमुख उमेदवारांच्या नावावर खलबते सुरू आहे. शनिवारी उशिरापर्यंत कुणाचेही नाव निश्चित झालेले नव्हते. १७ नोव्हेंबर उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे बंडखोरी टाळण्यासाठी भाजप नेतृत्वाकडून शेवटच्या क्षणाला उमेदवारी जाहीर करण्यात येणार, अशी चर्चा आहे.
मुख्यमंत्र्यांच्या दरबारी निर्णय
जिल्ह्याचे पालकमंत्री स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असल्याने तीनही पालिकेवर सत्ता स्थापन करण्याचे भाजप समोर आव्हान आहे. मात्र, अंतर्गत गटबाजीमुळे पक्षात टोकाचे शीतयुद्ध पेटलेले आहे. निवडणूक प्रभारीपदी निवड झालेले आमदार बंटी भांगडिया यांच्याही हस्तक्षेपावर अनेकांना आक्षेप आहे. त्यामुळे उमेदवारीसाठी थेट मुख्यमंत्र्यांना हस्तक्षेप करावा लागत आहे. अशा परिस्थितीत पक्षातील नेत्यांनी सावध पवित्रा घेतला असून यावर कुणीही उघडपणे प्रतिक्रिया देण्यास तयार नाही. त्यामुळे नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीवर अंतिम निर्णय मुख्यमंत्रीच घेणार असल्याचे कळते.
