आरोपींचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण
नागपूर : कुख्यात गुंड विजय ऊर्फ विजू नारायण मोहोड याचा खून केल्यानंतर अभय नामदेव राऊत (२८) रा. तुळजाईनगर आणि सूरज गंगाधर कार्लेवार (२९) रा. बेलदारनगर हे सोमवारी रात्री हुडकेश्वर पोलिसांना शरण आले. त्यांनी कुख्यात गुंड स्वप्निल सोळंके याच्याकडून ३० लाख रुपयांची सुपारी घेऊन विजयचा खून केल्याची माहिती समोर येत आहे. पण, पोलिसांनी मात्र जुगार अड्डा चालवण्याच्या वादातूनच हा खून झाला असून दुसऱ्या शक्यतेवर तपास सुरू असल्याची माहिती दिली.
कुही पोलिसांच्या हद्दीतील धामना येथे विजय मोहोड हा चोरून जुगार अड्डा चालवायचा, तर आरोपी अभय राऊत हा खरसोली येथे जुगार चालवायचा. विजयला खरसोली येथे जुगार अड्डा सुरू करायचा होता व एका शेतात त्याने जागा तयार करण्यासाठी वाळू टाकली होती. त्यावरून अभय राऊत व त्याच्यात वाद सुरू होता. रविवारी अभय राऊत हा खरसोलीपासून काही अंतरावर असलेल्या उड्डाणपुलाजवळ खरात नावाच्या मित्रासोबत बोलत असता पाठीमागून आलेल्या विजयने त्यांना कार आडवी घातली. अभय हा पाठीमागून कार काढून निघून गेला. त्यानंतर विजय हा पाचगाव परिसरातील पूजा बारमध्ये दारू प्राशन करण्यासाठी गेला. त्यावेळी अभयने त्याला भ्रमणध्वनी करून भेटण्याची इच्छा व्यक्त केली.
विजयने त्याला ४ वाजताच्या सुमारास अमित सावजी भोजनालयात बोलावले. अभय, निखिल तिडके, सूरज हे तिघे अमित भोजनालयात पोहोचले. तेथे पोहोचण्यापूर्वीच त्यांनी इतर मित्रांना बोलावून घेतले होते. त्यावेळी विजयसोबत वसंता राऊत व इतर मित्र होते.
त्या ठिकाणी विजय व अभयमध्ये जुगार अड्डा चालवण्यावरून चर्चा झाली. तडजोडीअंती विजयने अभयला आपल्या जुगाराची जागा दाखवण्यासाठी सोबत चलण्याची विनंती केली. अभयला शंका निर्माण झाली. त्याला वाटले की विजय आपल्याला दुसरीकडे नेऊन ठार करेल. त्याने निखिल व सूरज यांना घेऊन आशु वैद्य याच्या एमएच-४०, केआर-८८४९ क्रमांकाच्या कारमध्ये जाण्याची तयारी दर्शवली. विजय हा त्यांच्यासोबत एकटाच कारमध्ये बसला. जुगाराच्या ठिकाणी जात असताना विजय व अभयचे पुन्हा भांडण झाले. त्यामुळे त्यांनी कारमध्येच चाकूने विजयला भोसकले व खरसोली परिसरात रस्त्याच्या कडेला मृतदेह फेकून दिला, अशी कबुली अभयने पोलिसांसमोर दिली. पोलिसांनी दोघांनाही प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांसमक्ष हजर केले असता त्यांना २३ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. दुसरीकडे बीट टोळीचा म्होरक्या व विजयचा कट्टर शत्रू स्वप्निल साळुंके हा कारागृहात आहे.
पूर्वी स्वप्निल क्रिकेट बुकी व जुगार अड्डा संचालकांकडून हप्ता वसुली करायचा. पण, तो कारागृहात जाताच विजयने क्रिकेट बुकी व जुगार अड्डा चालवणाऱ्यांशी जवळीक साधून हप्ता वसुली सुरू केली होती. त्यामुळे दोन गटात टोळीयुद्ध भडकले व स्वप्निलने कारागृहात असताना अभय व सूरज यांना विजयला मारण्यासाठी ३० लाख रुपयांची सुपारी दिल्याची माहिती समोर येत आहे.